12 Rajysabha MP Suspended : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेससह पाच पक्षांच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. 11 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या 255 व्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. खासदारांनी या निलंबनाचा निषेध केलाय. निलंबन केलेल्या खासदारांमध्ये शिवसेना खासदार प्रियांका चर्तुवेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देत प्रियांका चर्तुवेदी यांनी म्हटलं की, ''निलंबन करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.''

प्रियांका चर्तुवेदी यांनी म्हटलं की, ''कोणी आरोपी असतील तर जिल्हा न्यायाधीशांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांची सुनावणी होते. त्यांच्यासाठी वकीलही दिले जातात. काही वेळा सरकारी अधिकाऱ्यांना आरोपींची बाजू जाणून घेण्यासाठी पाठवले जाते. मात्र, इथे आमची बाजूही ऐकून घेतली गेली नाही.' त्यांनी पुढे सांगितलं की, 'जर सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर लक्षात येईल की, संसदेत पुरुष मार्शल महिलांसोबत धक्काबुक्की करत होते. निलंबनाचा निर्णय एकतर्फी आहे. हे असंसदीय वर्तन आहे''

विरोधी पक्षांकडून संयुक्त निवेदन जारीनिलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात विरोधी पक्षांनी 12 खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी 12 खासदारांच्या निलंबनप्रकरणी मंगळवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जिन खरगे यांच्या कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत निलंबनाच्या कारवाईवर पुढे पाऊलं उचलण्याबाबत चर्चा करण्यात येईल. मात्र, या संयुक्त निवेदनात तृणमूल काँग्रेस सहभागी नाही. तृणमूल काँग्रेसच्याही दोन खासदारांचं निलंबन करण्यात आलंय.

निलंबनानंतर काँग्रेस खासदार रिपुन बोरा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ''आम्ही विरोधात प्रदर्शन केली. आम्ही शेतकरी आणि गरीब जनतेसाठी प्रदर्शन केली आणि ते आमचं कर्तव्य आहे की, आम्ही गरजू आणि वंचित जनतेसाठी आवाज उठवावा. जर आम्ही संसदेत भूमिका नाही मांडली तर इतर कुठे मांडणार ? निलंबनाची कारवाई लोकशाहीविरोधी असून ही लोकशाही आणि संविधानाची हत्या आहे.''

12 निलंबित खासदारांची यादी :

  1. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना)
  2. अनिल देसाई (शिवसेना),
  3. इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)
  4. फुलो देवी नेताम (काँग्रेस)
  5. छाया वर्मा (काँग्रेस)
  6. रिपुन बोरा (काँग्रेस)
  7. बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
  8. राजमणी पटेल (काँग्रेस)
  9. डोला सेन (काँग्रेस)
  10. शांता छेत्री (काँग्रेस)
  11. सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस)
  12. अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) 

 

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha