PM Modi on Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. संसद अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी संसदेचे कामकाज शांतते पार पडले अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, संसदेत किती तास कामकाज झाले हे महत्त्वाचे आहे. विरोधकांनी सरकारवर, सरकारच्या धोरणांवर टीका करावी, आवाज उठवावा. मात्र सभागृहाच्या, लोकसभा अध्यक्षांच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये याचीही काळजी सदस्यांनी घ्यावी असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. 


पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. संसदेचे हे सत्र आणि येणारे पुढील सत्र देशाच्या स्वातंत्र्याच्या भावनांच्या अनुरूपाने देशाच्या प्रगतीसाठी खासदारांनी चर्चा करावी. संसदेचे हे सत्र विचारांची समृद्धी दाखवणारा, दूरगामी प्रभाव निर्माण करणारा सकारात्मक निर्णय ठरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  


कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. भारताने 100 कोटी डोस दिल्याचा टप्पा पार केला आहे. आता लवकरच 200 कोटी डोस देण्याचा टप्पा पार करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


दरम्यान, दिल्लीत आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session 2021) सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कृषी कायदे रद्द करणारं विधेयक मांडलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावलाय. याशिवाय इंधन दरवाढ हा अधिवेशनात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. याशिवाय लखीमपूरच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक राहतील अशी चिन्हं आहेत. 


हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतरच्या या अधिवेशनात विरोधक केंद्र सरकारवर निशाणा साधणार आहेत. तसेच, पेगासस प्रकरण, महागाई, बेरोजगारी आणि सध्या चीन लगतच्या सीमांवर सुरु असलेले वाद यासंदर्भात विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारु शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेच्या वतीनं पारित केल्यानंतर तीनही कृषी कायदे रद्द करणारं विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. 


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA