Corona Vaccination : देशात कोरोना लसीकरण मोहिमेला अगदी तळागाळातील भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून देशाला मुक्त करण्यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. 


देशात प्रत्येकाच्याच मनात संपूर्ण देशाचं लसीकरण नेमकं कधी आणि केव्हा पूर्ण होणार याच प्रश्नानं घर केलं आहे. लसींचा तुटवडा, देशाची लोकसंख्या ही सारी आकडेवारी पाहता हे शक्य तसं होणार असेच विचार येत असताना आता काही गावं, खेडी आणि देशातील कानाकोपऱ्यातील ठिकाणांनी यामध्ये पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. 


हिमाचल प्रदेशातील वर्षातील जवळपास सहा महिने अती बर्फवृष्टीमुळे बंद असणाऱ्या लाहौल स्पितीमधील काझा जिल्ह्यानं शंभर टक्के लसीकरणाचा हा टप्पा गाठला आहे. काझामध्ये 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना इथं लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचीही तयारी इथं पूर्ण झाली आहे. बाहेरील क्षेत्रातून इथं आलेल्या कामगारांनाही इथं लस देण्यात आली आहे. 


Corona Vaccination: आज मुंबईत लसीकरण बंद! सोमवारच्या लसीकरणाबाबतची माहिती लवकरच... 


लसीकरणाच्या बाबतीत काझानं गाठलेलं हे वळण नक्कीय चांगल्या नियोजनाच्या निकालास्वरुप पाहायला मिळत आहे, यात शंका नाही. लसीकरणाच्याच बळावर अमेरिकेनं कोरोनासारख्या घातक महामारीवर मात करण्याची वाट मिळवली आहे, किंबहुना काही दिवसांपूर्वी म्हणजेच 14 मे रोजी व्हाईट हाऊसच्या एका पत्रकार परिषदेत खुद्द राष्ट्राध्यक्ष जो बायडन मास्क न घालता माध्यमांसमोर आले, जिथे त्यांनी या दिवसाचा उल्लेख मैलाचा दगड म्हणून केला. 


अमेरिकेनं हा दिवस तेव्हाच पाहिला, ज्यावेळी देशातील कमीत कमी 60 टक्के जनतेला लसीचा किमान एक डोस देण्यात आला होता. भारतात इतक्या मोठ्या संख्येनं लसीकरण हाती घेत ते पूर्ण झाल्यासही हा दिवस उजाडू शकतो. पण, त्यापूर्वी मात्र कठोर निर्बंधांचं पालन आणि अर्थातच शिस्तबद्ध नियोजनासोबतच वेगवान लसीकरणाची तीव्र गरज आहे. कारण, आतापर्यंत देशात फक्त 3 टक्के नागरिकांनाच लसींचे दोन डोस देण्यात आले आहेत. त्यामुळं ही आकडेवारी विचार करायला भाग पाडत आहे.