नवी दिल्ली :  पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधातील लढाईत मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील.

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कधीपर्यंत जमा करता येणार?

10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

उद्या एटीएम मशिन्स बंद :

देशभरात 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम मशिन्स बंद राहणार आहेत. तर दहा तारखेलाही काही ठिकाणी एटीएम मशिन्स बंद राहतील. एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील.

चिंतेचं कारण नाही :

पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील. 10 नोव्हेंबरपासून ही मर्यादा वाढवण्यात येईल.

ज्यांना 30 डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येतील.

रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील 72 तास म्हणजे 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दोन हजार रुपयांची नोट :

दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.