नवी दिल्ली: टी-सीरीज कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांची 1997 साली हत्या करणारा आरोपी आणि दाऊदचा खास हस्तक अब्दुर रऊफ मर्चेंटला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे.


बांगलादेश सरकार लवकरच रऊफला भारताकडे सोपवू शकतं. अब्दुर रऊफ हा दाऊद इब्राहिमचा खास हस्तक आहे. रऊफला 2009 साली नकली बांगलादेशी पासपोर्ट बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

मर्चेंटला बांगलादेशनं अटक केल्यानंतर पहिले गाजीपूरमधील काशिमपूर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नोव्हेंबर 2014 साली ढाकाच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं. गुलशन कुमार यांच्या हत्येपासून अब्दुल रऊफ फरार होता. सध्या त्याला बांगलादेशमधील ढाकाच्या जेलमधून त्याला सोडण्यात आलं आहे.

गुलशन कुमार यांच्या हत्येच्या आरोपाखील मर्चेंटला एप्रिल 2002 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईमध्ये 12 ऑगस्ट 1997 साली गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांच्या हत्येत अब्दुर रऊफचा हात होता.