रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. बिजापूरच्या नक्षलप्रभावित पुजारी कांकेर परिसरात तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.


या कारवाईत एका टॉप कमांडरसह दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये तेलंगणा पोलिस दलातील एक जवानही शहीद झाला आहे.

विशेष पोलिस महासंचालक डीएम अवस्थी (नक्षली कारवाई) यांनी नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये मिळालेल्या यशाला दुजोरा दिला आहे.

हे सगळे नक्षलवादी तेलंगणा स्टेट कमिटी ऑफ सीपीआयचे (माओवादी) सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे. खात्मा झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये हरीभूषणचाही समावेश आहे. हरीभूषण तेलंगणा स्टेट कमिटीचा कमांडर होता.

हरीभूषण हा सुरक्षादलावर हल्ला करण्याची योजना बनवत असे आणि तो आसपासच्या परिसरात कुख्यात होता. सुरक्षादलाने मृत नक्षलवाद्यांकडून एक AK-47, एक एसएलआर आणि पाच INSAS रायफल जप्त केली आहे.

बिजापूरच्या पामेड आणि उसूरच्या मध्य पुजारी कांकेर गावातील जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये पोलिसांनी दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, असं दक्षिण बस्तर क्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितलं.