मुंबई : मान्सून आणि पूर्व मान्सून पाऊस यांतील फरक काय आहे हे ओळखण्यात अनेकदा गोंधळ उडतो. जून महिन्यात साधारणतः पूर्व मान्सून पाऊस पडतो. मात्र त्यापूर्वी दक्षिण भारतात जेव्हा पाऊस सुरु होतो, तेव्हा भारतात पूर्व मान्सून पाऊस पडतो.
केरळात 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. त्याचवेळी ईशान्य भारतात देखील मान्सूनचा पाऊस पडण्यास सुरुवात होते. मात्र यापैकी मान्सून आणि पूर्व मान्सूनचा पाऊस कोणता हे ओळखण्यात गोंधळ होतो. यातील फरक ओळखण्यासाठी काही भौगोलिक बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.
तापमान:
मान्सून आणि पूर्व मान्सून पाऊस यांतील फरक तापमानातील बदलावरुन ओळखता येतो. जूनमधील आर्द्रता आणि वाढती उष्णता हे पूर्व मान्सून पावसाचे संकेत असतात. मात्र जोरात वाहणारे वारे आणि अचानक वातावरणात होणारे बदल हे मान्सून भारतात दाखल झाल्याचं दर्शवतात.
ढगांचे प्रकार :
पूर्व मान्सून पाऊस ओळखण्यासाठी ढग हा महत्वाचा घटक आहे. पूर्व मान्सून पाऊस दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ढग तयार होतात आणि ढगांचा आकार सातत्याने बदलत राहतो. तर मान्सून दाखल झाल्यानंतर ढगांचे थर एकसारखेच राहतात. या ढगांची खोली कमी असते, मात्र हे ढग दाट आणि ओलावा असणारे असतात.
पावसाच्या आगमनाची वेळ :
पूर्व मान्सून पाऊस हा वादळी वाऱ्यासह बरसतो. पूर्व मान्सून पाऊस नेहमी दिवस संपताना किंवा रात्री थोड्या वेळासाठीच येतो. मात्र, नैऋत्य मोसमी पाऊस हा अनेकदा मुसळधारही पडतो. दक्षिण भारतात मान्सूनमध्ये पाऊस रात्री किंवा दिवसा कधीही पडू शकतो. तर पूर्व मान्सून पाऊस हा केवळ दुपारनंतर किंवा सायंकाळच्या वेळेलाच पडतो.
वाऱ्याचे स्वरुप :
पूर्व मान्सून पाऊस हा नेहमी धूळ उडवणाऱ्या वाऱ्यासह पडतो. मातीतून निघणारा सुगंधही पूर्व मान्सून दाखल झाल्याचे संकेत दर्शवतो. तर मान्सून दाखल झाल्यानंतर वाऱ्याची झुळूक ही संथ असते.
भारतात पूर्व मान्सून येण्याआधी वातावरणातील बदलांमुळे समुद्र आणि जमिनीवर वारा मोठ्या प्रमाणात वाहतो. पण आकाशातील आर्द्रतेमुळे मान्सून पावसामध्ये अशी परिस्थिती नसते. पूर्व मान्सूनमध्ये पाऊस हा ठिकठिकाणी पडतो तर मान्सूनचा पाऊस हा अनेक ठिकाणी एकाच वेळी पडतो. भारतातील मुंबई, पुणे, हैदराबाद किंवा बंगळुरु या शहरांमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर मान्सूनचा पाऊस पडतो, असे गृहित धरतात.
केरळात मान्सून आलाय ते कसं कळतं ?
( मान्सूनच्या आगमनाची वर्दी अशी मिळते…) (मान्सूनच्या आगमनाचे निकष..)
निकष पहिला –
पाऊस (RAINFALL) – केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर 14 केंद्र आहेत, त्यातल्या 60 टक्के म्हणजे 8 ते 9 केंद्रावर सलग दोन दिवस किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस 2.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनची वर्दी समजली जाते, दुसऱ्या दिवशी हवामान विभाग मान्सून भारतभूमीवर आला अशी घोषणा करतं, मात्र त्यासाठी आणखी दोन निकष पाहिले जातात.
निकष दुसरा –
वाऱ्याचं क्षेत्र (WIND FIELD) – पश्चिमी वारे ठराविक वेगाने (ताशी 25 ते 35 किलोमीटर) आणि ठराविक दाबाने (600 हेक्टोपास्कल) वाहत असेल तर मान्सूनच्या आगमनाला पुष्टी मिळते
निकष तिसरा –
बहिर्गामी दीर्घतरंग प्रारण अर्थात Outgoing Longwave Radiation (OLR) – थोडक्यात उपग्रहांच्या आधारे त्या ठिकाणी ठराविक उर्जा – उष्णता आहे हे कळणं महत्वाचं. म्हणजे पावसासोबत वारे आणि त्या भागातील उर्जेची स्थिती हे तिनही निकष जुळून आले तरच मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते.
यासोबतच मान्सूनच्या प्रगतीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे मान्सूनची उत्तरी सीमा (Northern Limit of Monsoon (NLM) http://www.imd.gov.in/section/nhac/dynamic/Monsoon_frame.htm)
केरळात 1 जूनला आलेला मान्सून देशाच्या उत्तरेच्या बाजुने कसा पुढे सरकतो यावर त्याची प्रगती ठरते, मान्सूनचा पुर्वेकडील भाग ज्यावेळी ईशान्य भारतातच असतो त्यावेळी म्हणजे 10 जूनपर्यंत मान्सूनची उत्तरी सीमा पाऊस घेऊन मुंबईत पोहोचलेली असते, दिल्लीत साधारण 29 जूनला पोहोचलेल्या मान्सूनचा वेग मंदावतो आणि पश्चिम राजस्थानपर्यंत पोहोचायला मान्सून तब्बल 12 दिवस घेतो.
1 जूनला केरळात दाखल झालेल्या मान्सूनने 15 जुलैपर्यंत सर्व देश व्यापून टाकलेला असतो.
देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस : आयएमडी
देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने 18 एप्रिल रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला होता.
अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं होतं.