Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभेसाठी (Hingoli Lok Sabha) महायुतीकडून (Mahayuti)  शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून (BJP) कडाडून विरोध करण्यात येत आहे. काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, हेमंत पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला पहिल्यापासूनच भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सतत विरोध पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर भाजपने काल हिंगोलीत आढावा बैठक देखील बोलावली होती. या बैठकीत देखील हेमंत पाटील यांना महायुतीची उमेदवारी नकोच असा सूर उमटला. याचवेळी जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आल्या. तसेच हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम आम्ही करणार नसल्याची थेट भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांनी घेतली आहे. या सर्व घटनेची गंभीर दखल महायुतीमधील मुख्य नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, काल रात्री हेमंत पाटील यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आल्याची माहिती असून, त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक देखील झाल्याची माहिती मिळत आहे. 


उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू?


भाजपकडून होणार विरोध पाहता तात्काळ हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सूचना सुद्धा दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. तर, हेमंत पाटील यांच्या जागेवर बाबुराव कदम यांना उमेदवारी देता येऊ शकते का? याची सुद्धा चाचपणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे. 


नवीन उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर 


विशेष म्हणजे भाजपने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. उमेदवारी बदलण्याच्या मागणीनंतर उमेदवार बदलून नवीन उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर दिली जाणार आहे. तसेच, भाजपच्या पदाधिकारी यांच्या मागणीवरून उमेदवार बदलत असून, आता नवीन उमेदवार भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन निवडणून आणावा असे एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपच्या नेत्यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


उमेदवार बदलण्याची शक्यता :  शिरसाट 


दरम्यान यावर बोलतांना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहे की, “सेनेकडून घोषित केलेल्या आठ जागा पैकी एखादा उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातून (हिंगोली किंवा हातकणंगले किंवा दोन्ही)  उमेदवार बदलला जाण्याची शक्यता असल्याचे संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


हिंगोलीत महायुतीत बिघाडी, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला जोरदार विरोध, भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मोठी मागणी