हिंगोली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी राज्य सरकार (Maharashtra Government) कमालीचं ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजातील (Maratha Reservation) नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्यासाठी राज्य सरकार विचाराधीन असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी मराठवाड्यातील मराठा नागरिकांच्या जुन्या नोंदणी तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महसूल विभाग त्याचबरोबर शिक्षण विभागातील जुन्या नोंदीमध्ये कुणबी जातीचा कुठे उल्लेख आहे का, याची तपासणी करण्याचं काम सुरू आहे. 


कुणबी नोंदणीची तपासणी युद्धपातळीवर


यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या महसूल आणि शैक्षणिक नोंदी तपासल्या जात आहेत. निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी निजाम काळ झालेले राष्ट्रीय करार दस्तावेज आणि इतर कागदपत्रे त्याचबरोबर मराठा समाजातील लोकांची वंशावळ या सोबतच हक्क नोंदणी खासर प्रमाणपत्र नोंदणीवर कुणबी जातीचा उल्लेख आहे का याची तपासणी केली जात आहे.


कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अहवाल आठ दिवसात द्या, मुख्यमंत्र्यांचा आदेश


 

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला अहवाल आठ दिवसाच्या आत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. या समितीला आधी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे हे उपोषण मागे घेत नसल्यामुळे आता ही मुदत आठ दिवसांवर आणण्यात आली आहे. 


जरांगे यांचं आमरण उपोषण सुरुच


जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.


मराठा आरक्षणासाठी टॉवरवर चढून आंदोलन


जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे मराठा आंदोलकांनी चक्क टावर चढून आंदोलन केलं आहे. तसेच राज्य सरकारचे विरोधात घोषणाबाजी करून जरांगे पाटलांना आम्ही एकटे सोडणार नाही, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत प्राणाची आहुती देऊ मात्र, माघार घेणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यावेळी अनेक आंदोलन टेलिकॉम कंपनीच्या टॉवरवर चढले आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली उतरणार नसल्याची भूमिका सुद्धा आंदोलकांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.