Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपकडून (BJP) दावा केला जातोय. भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. तसेच हिंगोलीची जागा महायुतीमध्ये भाजपसाठी सोडून घ्यावी अशी विनंती केली जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या दिग्गज नेते मंडळींनी हिंगोलीची लोकसभा लढवण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे शिवसेना खासदार हेमंत पाटलांची (MP Hemant Patil) उमेदवारी धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान याबाबत हेमंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


हिंगोली लोकसभा मतदारसंघावर भाजपने केलेल्या दाव्यावर बोलतांना हेमंत पाटील म्हणाले की, “राजकारण करत असतांना प्रत्येक पक्षाला ज्या त्या पक्ष संघटनां वाढवण्याचा अधिकार आहे. काम करत असतांना एखाद्या कार्यकर्त्याला मोठ व्हावं वाटत, त्या अनुषगाने भाजपचे काही कार्यकर्ते ही जागा मागण्यासाठी गेले असून, त्यात काही गैर वाटत नाही. मात्र, गेल्या 25 वर्षापासून ही जागा शिवसेनेकडे आहे. 1990 पासून शिवसेना ही जागा लढवते आणि सेनेचे अनेक खासदार होऊन गेले. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आम्ही बारा खासदार गृहमंत्री अमित शाहांना भेटलो, त्यावेळी त्यांनी 12 खासदारांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. तसेच या 12 खासदारांचे पूर्णपणे संरक्षण करण्यात येईल. त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहे आणि निश्चितच ही जागा शिवसेनेला मिळेल, असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.  


खासदारांच्या बैठकीत विजयी जागांवर दावा... 


चार दिवसांपूर्वी मुंबईमध्ये सर्व खासदारांची बैठक झाली. ज्यात गेल्यावेळी शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या आणि 18  जागांवर विजय देखील झाला होता. त्यामुळे यंदाही 22 जागा शिवसेनेने मागितल्या पाहिजे. तसेच विजय मिळवलेल्या 18 जागा निश्चित आम्हाला भाजपने दिल्या पाहिजे अशी सर्व खासदारांनी मागणी केली असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. 


आम्ही एकसंघ होऊन विजय मिळवणार...


भाजप आमदार तानाजी मुटकुळे हे माझे चांगले मित्र आहेत. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी माझं काम केलं आहे आणि ही युती आहे. ज्यावेळी सेनेला उमेदवारी मिळते, तेव्हा भाजपचे पदाधिकारी काम करतात आणि जेव्हा भाजपला उमेदवारी मिळते तेव्हा सेनेचे सर्व पदाधिकारी काम करतात. नवा मित्र आम्हाला अजित दादाच्या राष्ट्रवादीच्या स्वरूपात मिळालेला आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मी सर्व एकसंघ होऊन या मतदारसंघावर विजय मिळवू असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 


मतदारसंघात कामं केली...


विरोधकांकडे आरोप करण्यासारखं काहीही नाही.  प्रत्येक तालुक्यामध्ये कुठला ना कुठला मोठा प्रकल्प आणलेला आहे. खासदारांची जी काम असतात त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केला. हळद संशोधन केंद्र, सरकार लीगो सारखा 14 वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प, पोफळी सारखा बंद पडलेला साखर कारखाना असेल, गेल्या 40 वर्षापासून पूर्णा नदीवरील मागणी असलेले बंधारे, मागील तीस वर्षापासून मागणी असलेले पैनगंगा नदीवरील बंधारे हे सर्व कामे मार्गे लागले असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. 


रामटेक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरही भाजपचा दावा


महायुतीमध्ये अजूनही जागावाटपाचा निर्णय अंतिम झालेला नाही. मात्र, शिवसेना-भाजप युतीत नेहमी सेनेच्या ताब्यात असणाऱ्या काही जागांवर भाजपकडून दावा केला जात आहे. यापूर्वी रामटेक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघावरही भाजपनं दावा केला आहे. त्यात आता हिंगोली लोकसभा मतदारसंघ देखील भाजपकडे देण्याची मागणी होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आणखी एका जागेवर भाजपचा दावा, राणेंपाठोपाठ दुसरा केंद्रीय मंत्री इच्छुक