Lok sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या जागावटपावरुन महायुतीमध्येही तिढा असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) अनेक जांगावर भाजपाकडून (BJP) दावा करण्यात येत आहे. रामटेक, सिंधुदुर्गनंतर आता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघावरही भाजपनं दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून केंद्रीय मंत्र्यांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून (chhatrapati sambhaji nagar) लोकसभा निवडनूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते आज पंढरपूरमध्ये आले होते, त्यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर भाजपनं दावा केल्याचेही सांगितलं.


भाजपचा दावा, शिंदेंची अडचण - 


येत्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजपने मागितला असून मी तेथील इच्छुक उमेदवार असल्याचा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केला. कराड यांच्या दाव्यानंतर महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे . छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढविण्याबाबत आग्रही आहे. युतीमध्ये ही जागा पहिल्यापासून शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाचा दावा आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जागेवर भाजपने लक्ष केल्याने आता महायुतीत पुन्हा या जागेवरून वाद वाढण्याची चिन्हे आहेत. संभाजीनगरची जागा भाजपने मागितली आहे , यावर केंद्रीय समिती अंतिम निर्णय घेणार असून आपण या जागेवर इच्छुक असल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.यावेळी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक , सोमनाथ अवताडे , उत्तमराव जाणकार आणि इतर नेते उपस्थित होते. 


माढ्यातही भाजपसमोर तिढा -


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जिंकलेल्या 23 जागांवर निरीक्षक नेमण्यात आले आहेत.  कराड हे माढा लोकसभेच्या उमेदवारी चाचापाणीसाठी आले आहेत. माढ्यातून जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांची आपण भेट घेणार असून येथील सर्व अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भाजपमधून विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोघे या माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या दोघांच्या गटबाजीमुळे माढा लोकसभेची जागा अडचणीत आली आहे. यामुळेच आज भागवत कराड हे टेम्भूर्णी येथे भाजप इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर हा गुप्त अहवाल महाराष्ट्र भाजपकडे सोपवला जाणार आहे. त्यानंतर तो केंद्रीय पार्लमेंटरी पार्टीकडे दिला जाईल असे कराड यांनी सांगितले. अजून कोणताही उमेदवार निश्चित झाला नसून याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी कमिटी घेईल.  सध्या महाराष्ट्रातील जातीजातीत वातावरण अतिशय खराब असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप आग्रही आहे.