Ganeshotsav : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त बिहारची राजधानी पाटणा शहरात स्थायिक झालेल्या सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठी लोकांनी महाराष्टपासून हजारो मैल दूर राहून मराठी अस्मिता जोपासली आहे. सन 1972 पासून येथील मराठी बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे बिहारची राजधानी असलेल्या शहरात यावर्षी मराठी बांधव सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव साजरा करीत असून या उत्सवाला मराठी साज चढविण्यात आला आहे.


पाटण्यामध्ये सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठी बांधव सोने-चांदीचा गलाई व्यवसाय करीत आहेत. महाराष्टपासून हजारो मैल दूर असले तरी महाराष्टची संस्कृती, परंपरा व अस्मिता त्यांनी कायम जपली आहे. सन १९७२ पासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. बिहारमध्ये राहून मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन मराठी बांधवांना घेता येत नव्हते.


पाटणा येथील महाराष्ट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सचिव संजय भोसले यांच्या मागदर्शनाखाली सन 2014 पासून लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईहून आणून पाटणा येथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या कालखंडात या ठिकाणी हळदी-कुंकु, मुलांसाठी विविध स्पर्धा घेतली जाते. शिवाय बिहारमध्ये प्रशासकीय विविध पदावर कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्यांचाही मंडळाकडून महाराष्ट्रीयन फेटा बांधून सत्कार केला जातो.


माजी राज्यपालांनी दिली जागा


पाटणा शहरात मराठी बांधवांनी 1972 ला गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी सन 1974 मध्ये श्री गणरायाच्या दर्शनासाठी आलेले बिहारचे तत्कालीन मराठी राज्यपाल रामचंद्र धोंडीबा भंडारे यांनी पाटणा येथील 20 गुंठे जागा मराठी सण-उत्सव साजरा करण्यासाठी दिली. त्याच जागेत यावर्षीचा मराठमोळा सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव साजरा होत आहे.


विसर्जनाला सांगलीचे झांज पथक


पाटणा येथील मराठमोळ्या गणेशोत्सवाच्या काळात महाराराष्ट्रीयन फेटे बांधण्यासाठी दरवर्षी विटा येथील मच्छिंद्र कणसे तर मूर्ती प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत पूजा, आरती करण्यासाठी रेणावी (ता.खानापूर) येथील श्रीपूजक प्रशांत जहांगीरदार यांना संधी मिळते. यावर्षी विसर्जन मिरवणूकीसाठी सांगली येथील श्री झांज पथकाला निमंत्रित केले असून सांगलीच्या या मराठमोळा झांज पथकाचा आवाज बिहारच्या राजधानीत घुमणार आहे.