Hingoli News: नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat Elections) संपल्या असतानाच आता हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची (Vasmat Agricultural Produce Market Committee) निवडणुकीची (Election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यातील एक महत्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या या बाजार समितीमध्ये शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 25 डिसेंबरला यासाठी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. 


सांगलीनंतर हळदीची सर्वाधिक विक्री होणारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 25 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. बाराही महिने हळदीची विक्री होणाऱ्या या बाजार समितीचा निवडणुकीच्या रणधुमाळीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आत्ताचा ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असतानाच आता जिल्ह्यातील आणखी एक महत्वाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मात्र यात शिंदे गट विरोधात राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. 


वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत बाराही महिने हळदीची विक्री होत असल्याने या बाजारपेठेची राज्यभरात ओळख आहे. त्यामुळे ही बाजार समिती आपल्याच ताब्यात असावी यासाठी राजकीय पक्षाकडून प्रयत्न असतो. दरम्यान 25 डिसेंबरला या बाजार समितीची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शेतकरी विकास पॅनल तर शिंदे गटाच्या वतीने शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनल अशा दोन पॅनलची थेट लढत होणार आहे. तर राष्ट्रवादीच्या पॅनलचं नेतृत्व आमदार चंद्रकांत नवघरे करत असून, शिंदे गटाच्या पॅनलचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती राजेश इंगोले करत आहेत. त्यामुळे बाजार समिती आपल्याच ताब्यात घेण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. 


एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप 


वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी दोन्हीही पॅनलच्या वतीने सर्व प्रयत्न केले जात आहेत. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलकडून सुरु आहे. दरम्यान याचवेळी दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहे. त्यामुळे वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 25 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे. 


काय सांगता! चक्क आमदाराच्या घरी चोरट्यांचा डल्ला, हिंगोली जिल्ह्यातील घटना