Gram Panchayat Election Results 2022 : राज्यात मंगळवारी 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीतर्फे विजय आमचाच असा दावा करण्यात आला. तर दुपारी तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात लाडूही वाटले. तर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एकमेकांना पेढे ही भरवले. मात्र आज, बुधवारी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील 4 हजार 19 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी विजय मिळवला असल्याचा दावा विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केला आहे.
ग्रामपंचायतींवरील निकालाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून 3 हजार 258 जागांवर विजय मिळवला असून 761 जागा महाविकास आघाडीतील मित्रांच्या आहेत. अशा एकूण 4019 ग्रामपंचायती महाविकास आघाडी सरकारला मिळाल्या यावेळी ते म्हणाले. तसेच भाजप आणि शिंदे गटाला 3013 ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
नाना पटोले यांचाही दावा
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 900 पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारुण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात 236 पैकी 200 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला 36 जागाही मिळाल्या नाहीत, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
दावे प्रतिदावे...
सात हजार 751 ग्रामपंचायतीत एकूण 65 हजार 916 सदस्य तसेच थेट सरपंचपदासाठी निवडणूक झाली. त्यापैकी 14 हजार 28 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर 699 सरपंच बिनविरोध निवडून आले. 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी, 18 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपने 2023, राष्ट्रवादी काँग्रेसने 1215, शिंदे गटाने 772, काँग्रेसने 900, ठाकरे गटाने 639 तर अन्य पक्षांनी 1135 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला असल्याचा दावा केला होता.
ही बातमी देखील वाचा