Hingoli Crime News: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या गटातील आमदारांना थेट गुवाहाटीला घेऊन गेले. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीवरून गुवाहाटीची जगभरात चर्चा झाली. पण आता हेच गुवाहाटी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलं आहे. कारण हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) चोरांनी चोरी केल्यावर पोलिसांच्या भीतीने चक्क विमानाने गुवाहाटी गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गुवाहाटी आता चोरांना देखील सुरक्षित वाटू लागले असल्याची पाहायला मिळत आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या चिखलवाडी भागातील खडेश्वर बाबा आश्रम आहे.  या आश्रमात सुमेरपुरी शंभुपुरी महाराज वास्तव्यास असतात. दरम्यान त्यांच्या आश्रमावर रात्रीच्या सुमरास घुसलेल्या चोरांनी त्यांच्या डोक्याला पिस्टल लावून सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तर घटनेला गांभीर्याने घेत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना करत पथकाची नियुक्ती केली होती. 


पोलिसांच्या भीतीने पोहचले गुवाहाटीला... 


दरम्यान पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत तपास सुरु केला असता, राहूल विठ्ठल धनवट (रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा), शिवाजी खरात, कैलास शिवराम देवकर (रा. गांधीनगर गोरेगाव), प्रदिप उत्तमराव गायकवाड (दोघे रा. गंगानगर हिंगोली), अंकुश जालिंदर गायकवाड (रा. इंदिरानगर हिंगोली), यांनी चोरी केली असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला असता, ओमसाई खरात व प्रदिप गायकवाड हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. तर राहुल धनवट पुण्यात आणि कैलास देवकर व अंकुश गायकवाड हे दोघे गुवाहाटीला पळून गेले. 


अन् विमानाने गुवाहाटीवरून परतले 


पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यावर ओमसाई खरात व प्रदिप गायकवाड हे थेट गुवाहाटीला गेल्याचे समोर आल्याने त्यांना अटक कसे करावे असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना संपर्क करून परत येण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर मंदिरातील पुजाऱ्यांनी आरोपींना माफ करू आणि पोलीस कायदेशीर मदत करतील असे आमिष दिल्यावर चोरटे परत येण्यासाठी तयार झाले. त्यानंतर दोघेही गुवाहाटीवरून विमानाद्वारे चेन्नई आणि चेन्नईहून नागपूरला दाखल झाले. तर नागपूर विमानतळावरून हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील पाचही चोरट्यांकडून पोलिसांनी एक पिस्टल, तीन जिवंत काडतूस आणि सोन्याचे दागिने असा 3 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; हिंगोलीतील संतापजनक प्रकार