Hingoli News : जळगाव नंतर हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा भागात उत्पादन घेतले जाणारे केळीला राज्यासह देशभरात मागणी असते, परंतु काल इथल्या शेतकऱ्याचे स्वप्न क्षणात मातीमोल झाले. वर्षभर जीवापाड जपलेली केळीची बाग अवघ्या 30 मिनिटात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे. काय घडले नेमके?


केळीच्या बागा वादळी वाऱ्यात क्षणात जमीनदोस्त
हिंगोली जिल्ह्यात काल अचानक वादळी वारा सोसाट्याने सुटला, यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गिरगाव शिवारातील प्रमुख पीक असलेल्या केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो रुपये खर्च करुन लहानाचे मोठे केलेल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यात मध्ये क्षणात जमीनदोस्त झाल्या आहेत. या बागांसोबत शेतकऱ्यांचे स्वप्न सुद्धा नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील दोन वर्षांचे नुकसान या वर्षी भरून निघेल अशी अपेक्षा होती, परंतु तसे न होता या वादळी वाऱ्यात सर्व बागा जमीनदोस्त झाल्या आहेत 


शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, डोळ्यादेखत स्वप्नाचा चुराडा 
क्षणात शेतकऱ्यांचा स्वप्नाचा चुराडा झाला आहे. अथक परिश्रम, निसर्गाशी दोन हात करूनही शेतकऱ्याचं सप्न मातीमोल झाले आहे. एकीकडे वावरात असलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे निसर्गाच्या प्रकोपामुळे हे पीकही आता हातातून गेलंय. वर्षभर जोपासलेली केळीची बाग अवघ्या तीस मिनिटात जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.


जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाचा तडाखा; कोट्यवधी रुपयांचे नुकसान
जळगाव जिल्ह्यातील केळी पट्टा असलेल्या रावेर तालुक्यात पुन्हा वादळी पावसाचा तडाखा बसल्याने केळी पिकांचं कोट्यवधी रुपयांचे  नुकसान झाले आहे, मागील आठवड्यात रावेर तालुक्यात काही भागात मोठे नुकसान झाले असताना, काल रात्री पुन्हा वादळी पावसाचा तडाखा बसून नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे मोठे संकट उभे राहिले आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटांच्या मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाही, केळी पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्यात गेल्या काही वर्षात मे आणि जून मध्ये चक्री वादळ होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. अशाच घटनेत मागील आठवड्यात अहिरवाडी भागात मोठ नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच, काल रात्री चे वेळेस रावेर तालुक्यातील, सावखेडा,खिरोदा,धामोडी, कांड वेल भागात जोरदार वादळी पाऊस झाल्याने या भागातील शेकडो एकर वर असलेले केळी पीक जमीनदोस्त झाले आहे. मागील वर्षी ही नुकसान झालेल्या पिकाची अद्याप कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचं आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे, जर मदत मिळणारच नसेल तर पंच नामे ही करू नका अस संतप्त सवाल ही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे