Hingoli Sengaon Bogus Doctor Story :  हिंगोलीच्या सेनगाव शहरात बनावट प्रमाणपत्र तयार करून बोगस हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.  चक्क आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, मात्र या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या गोरखधंद्यावर डॉक्टरांच्या निमा संघटनेने आक्षेप घेतला.


सेनगाव शहरात उभारलेले हृदेश हॉस्पिटल हे बोगस असल्याचा दावा निमा संघटनेनं केला आहे. वैद्यकीय व्यवसायाचा बनावट परवाना तयार करून हे रुग्णालय ज्ञानबा टेकाळे आणि माधव रसाळ या दोघांनी हे हॉस्पिटल तयार केल्याचा आरोप केला जात आहे. 


एवढं मोठं रुग्णालय बोगस आहे हे या मुन्नाभाईच्या एका चुकीमुळे उघड झालं. कोणतेही रुग्णालय सुरू करायचं असेल तर डॉक्टरांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्याकडून अधिकृत परवाना घ्यावा लागतो. या दोन मुन्नाभाईंनी हा परवानाच बनावट तयार केला आहे. इतका हुबेहूब परवाना तयार केला की चक्क आरोग्य अधिकाऱ्यांना सुद्धा यावर संशय आला नाही. परंतु या मुन्नाभाईंनी एक चूक केली ती म्हणजे परवान्याचा सिरीयल क्रमांक हा नऊ लाखापासून सुरुवात केला. इथेच मुन्नाभाईंचे बिंग फुटलं फुटले.  डॉक्टरांच्या निमा संघटनेने यावर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  


डॉक्टर टेकाळे आणि डॉक्टर रसाळ या दोघांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल यांचे परवाना प्रमाणपत्र हे बनावट तयार केल्याचा आरोप कौन्सिलचे नोंदणी अधिकारी असलेले डॉक्टर दिलीप वांगे यांनी केला आहे. दिलीप वांगे राज्यभरातील सर्व डॉक्टरांना मेडिकल कौन्सिलचा परवाना देत असतात.  


या प्रकरणानंतर आम्ही प्रशासनाची ही भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता यावर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी  यांनी दिले आहे.
  
या दोन मुन्नाभाईंनी थाटलेल्या या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते. त्यामुळे अनेक रुग्णांच्या जीवाशी या ठिकाणी खेळ होत असल्याचं सांगत बनावट परवाना प्रमाणपत्र तयार करणार्‍यांचा शोध घ्यावा अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली आहे