हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवरती झोपवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलांना रूग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने भर थंडीत जमिनीवरती झोपवल्याची वेळ आली आहे. आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक हा प्रकार एबीपी माझाने दाखवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सचिवांना फोन केल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


एबीपी माझाच्या बातमीचा दणका 


तर हे प्रकरण समोर आल्यानंतर आता त्या रूग्णालयातील बेडची क्षमता वाढवली आहे, अशी माहिती समोर आली आहे. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर रूग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी रुग्णालयाला भेट दिली. रूग्णालयाची पाहणी देखील केली. घडलेल्या प्रकारावर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर रुग्णालयात 20 कॉट वाढवण्यात आले आहेत. आता रुग्णालयात एकूण 50 कॉट उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी दिली आहे. 


बेडची क्षमता वाढवली


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, काल आपल्या या रूग्णालयात 43 महिलांचं कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. या शस्त्रक्रियेसाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांची सोय करून देण्यात आलेली होती. य महिलांसाठी डॉक्टांराची, औषधांची, गोळ्यांची विनामुल्य व्यवस्था करण्यात आलेली होती. यावेळी शस्त्रक्रियेनंतर या महिलांसाठी आपण संतरंजी, गाद्या, बेडशीट आणि ब्लँकेटची सोय करून देण्यात आलेली होती, त्यामुळे शस्त्रक्रिया झालेले पेशंट आणि त्यांचे कुटूंबीय देखील संतुष्ट होते. या ठिकाणी स्वच्छतेची काळजी देखील पुरेपूर घेतली होती. काही पेशंटला डिस्चार्ज मिळाला त्यावेळी ते देखील आणि त्यांचे कुटूंबीय देखील संतुष्ट होते. हे ग्रामीण भागातील तीस कॉटचं रूग्णालय मंजूर करण्यात आलं आहे. मात्र आता तत्काळ गरजेमुळे वीस कॉट पाठवलेले आहेत. त्यामुळे आता या रूग्णालयात पन्नास कॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी दिली आहे. 


संबधित घटनेची चौकशी होईल


पुढे बोलताना ते म्हणाले, यापुढे होणाऱ्या शस्त्रक्रियेनंतर सर्व पेशंटला बेडवरती झोपवण्याच्या सक्त सूचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. महिलांना झोपण्याची सुविधा केली तो वॉर्ड नवीन आहे. तिथे स्वच्छता ठेवण्यात आलेली होती. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आलेली होती. त्याचबरोबर शौचालयाची देखील स्वच्छता होती. या घटनेनंतर आता बेडची संख्या वाढवण्यात आलेली आहे, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी मी ग्वाही देतो. संबधित घटनेची चौकशी होईल. यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी दिली आहे. 


आणखी वाचा - Hingoli News: शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीत झोपवलं जमिनीवर; आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार