Hingoli Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेत शिवारात पाणीच पाणी झालं आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लोहगावच्या शेत शिवारामध्ये ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं जवळपास असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोयाबीनसह हळद आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

Continues below advertisement


हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला आहे. तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. तसेच दुपारी एक वाजल्यापासून जिल्ह्यातील पावसाला प्रारंभ झाला, ज्यात हिंगोली शहरासह कळमनुरी, वरुड, डोंगरकडा, जवळापांचाळ, आखाडा बाळापूर, डिग्रस कन्हाळे, वारंगाफाटा, शिरडशहापूर, औंढा नागनाथ, कुरुदा, जवळा बाजार, कौठा आदी भागांमध्ये दुपारच्या वेळी रिमझिम पाऊस सुरूच होता. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेले पाहावयास मिळाले. आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळं काही भागात शेती पिकांचं नुकसान झालं आहे.