Hingoli News : जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या असणाऱ्या अमेरिकेतील एमआयटी (Massachusetts Institute of Technology) विद्यापीठामध्ये आता हिंगोलीच्या (Hingoli) शेतकऱ्याचा मुलगा शिक्षण घेणार आहे. आकाश पोपळघट असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. जगातून फक्त 40 विद्यार्थ्यांचा प्रवेश या विद्यापीठात निश्चित केला जातो. त्यामध्ये भारतातून आकाश हा एकमेव विद्यार्थी आहे.


सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील शेतकरी गजानन पोपळघट यांचा आकाश हा मुलगा. आकाश सुरुवातीपासूनच अभ्यासात अग्रेसर होता. आकाशचे  पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण कहाकर येथे झाले. आकाशची इंग्लिशमध्ये आवड निर्माण होऊ लागली. परंतु सेमी इंग्लिशची शिक्षण प्रणाली गावाकडे नसल्याने पाचवीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी आकाशला रिसोड येथे पाठवण्यात आले. रिसोड येथे त्याने सेमी इंग्लिशमध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे सायन्समध्ये शिक्षण घेण्यासाठी आकाशने नांदेड, लातूर येथील क्लासेसमध्ये अनुभव घेतला. परंतु अपेक्षित अशा दर्जाचे शिक्षण कुठेही दिले जात नव्हते. त्यामुळे आकाशने अकरावी आणि बारावीचे शिक्षण राजस्थानच्या कोटा येथे घेतले. त्या ठिकाणी सायन्सचे शिक्षण घेत असताना एमआयटी विद्यापीठाची खरी ओळख आकाशला झाली. 




प्रवेशासाठी रोज 18 तास अभ्यास 
आपणही एमआयटीमध्ये शिक्षण घ्यावे असे आकाशला वाटत होते. परंतु घरची परिस्थिती बेताची आणि त्यात एमआयटीचे शिक्षण घ्यायचे म्हटले तर अमेरिकेत राहणे, तेथील शिक्षण हा खर्च अजिबात पेलणारा नव्हता याची जाणीव आकाशला होती. तरीही आकाशने जिद्द सोडली नाही. कारण त्या ठिकाणी सेट ऑलिम्पियाड यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा, जेईई मेन्स अॅडव्हान्सची तयारी सुद्धा आकाशने केली होती. आता थेट एमआयटीला अर्ज करता येतो हे कळल्यानंतर त्याने रोज 18 तास अभ्यास करुन परीक्षा द्यायचे ठरवले आणि एमआयटीची परीक्षा आकाश उत्तीर्ण झाला. आकाश एमआयटी विद्यापीठात प्रवेशासाठी पात्र असल्याचे पत्र विद्यापीठाच्या वतीने पाठवण्यात आले होते. हे झाले खरं परंतु आता परदेशातील शिक्षणाच्या आर्थिक गणित कसं साधायचं. कारण आकाशच्या वडिलांकडे फक्त दोन एकर शेती, तिही कोरडवाहू एक लहान भाऊ, आई गृहिणी आणि या सगळ्या संसारामधून आकाशला परदेशातील शिक्षणासाठी पैसे येणार कुठून हा प्रश्न होता. 


शिष्यवृत्तीसाठी पात्र, पतसंस्थांकडून मदत
परदेशातील शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा आकाश पात्र ठरला आणि आता अनेक पतसंस्थांनी आकाशला मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. आकाश पुढे एरोस्पेस आणि फिजिक्समधील अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. त्यानंतर आकाशला चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे. आकाशचे संपूर्ण यश पाहता त्याचा जागोजागी सत्कार केला जात आहे आणि आपल्या कष्टाचा चीज झाल्याचा अनुभव आकाशच्या आई-वडिलांना सुद्धा येऊ लागला आहे.