Truck Drivers Strike : केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याला विरोध करत ट्रक चालक (Tanker Drivers) आणि इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचे सर्वाधिक परिणाम पेट्रोल पंपावर (Petrol Pump) जाणवत आहे. दरम्यान, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आता पेट्रोल पंपावरील इंधन संपत असल्याने इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, परभणीनंतर (Parbhani) आता हिंगोली (Hingoli) शहरातील महत्वाच्या 4 पेट्रोल पंपावरील इंधन संपले आहेत. तसेच, तर शहरालगत आसलेले चार ते पाच पेट्रोल पंपावरील इंधन देखील संपण्याच्या मार्गावर आहे.
इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपानंतर कालपासून हिंगोली शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. अधिका अधिक पेट्रोल भरण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. दरम्यान, इंधन टँकर बंद असल्याने कालपासून पेट्रोल-डीझेलचा पुरवठाच झाला नाही. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांकडे असेले इंधन देखील संपले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी निर्माण झाले आहे. हिंगोली शहरातील चौधरी पेट्रोल पंप, खुराणा पेट्रोल पंप, पोलीस पेट्रोल पंप आणि नाईक पेट्रोल पंप या चारही पेट्रोल पंपावरील इंधन संपले आहेत. त्यामुळे हिंगोलीकरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपावर 'नो स्टॉकचे बोर्ड' पाहायला मिळत असल्याने वाहनधारकांना माघारी जावे लागत आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी 10 टक्के पेट्रोल आरक्षित
वाहतूक कायद्याच्या विरोधामध्ये आज ट्रान्सपोर्ट युनियनने संप पुकारलेला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर कालपासूनच पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती. ही गर्दी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर आज सकाळी देखील हिंगोली शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर अशीच काही गर्दी पाहायला मिळाली. तर, आता शहरातील चार महत्वाच्या पेट्रोल पंपावरील इंधन संपल्याने या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. परिणामी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. विशेष म्हणजे शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपावरील इंधन देखील संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक पेट्रोल पंपावर आपत्कालीन परिस्थितीसाठी 10 टक्के पेट्रोल आरक्षित ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
संपाच्या पार्श्वूमीवर पेट्रोलची साठेबाजी...
नवीन वाहतूक कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने संप करण्यात येत आहे. याचा परिणाम पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत असून, पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्ये अनेकांकडून पेट्रोलचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैधरित्या पद्धतीने मोठ-मोठ्या कॅनमध्ये पेट्रोल भरून वाहतूक केली जात आहे. तसेच, हे पेट्रोल पुढे खेडोपाड्यात किराणा दुकान आणि पान टपऱ्यावर चढ्यादराने विक्री केली जाते. हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंपवर भल्या मोठ्या कॅनमध्ये पेट्रोल देत असल्याचा प्रकार माझाच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे 'एबीपी माझा'ने ही बातमी दाखवताच जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली आहे. तर, या संपूर्ण प्रकरणाची तहसीलदाराच्या माध्यमातून चौकशी होणार आहे, अशी माहिती हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Truck Drivers Strike : परभणी शहरातील 15 पैकी 10 पेट्रोल पंपावर 'नो स्टॉक'; शहरात इंधन टंचाईची शक्यता