छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने आणलेला नवीन वाहन कायदा म्हणजेच हिट अँड रन कायद्यात करण्यात आलेल्या कठोर शिक्षेची तरतुदीला विरोध करत देशभरातील ट्रक, टँकरसह व्यावसायिक वाहनचालक संपावर गेले आहेत. अशात इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे मराठवाड्यातील (Marathwada) बहुतांशी पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहे. कुठे पोलीस बंदोबस्तात इंधन विक्री केली जात आहे, तर कुठे पेट्रोल-डीझेल (Petrol-Diesel) खरेदीसाठी आलेल्या वाहनधारकांमध्ये वाद होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे इंधन संपल्याने काही पेट्रोल पंप थेट बंद करण्यात आले आहे. 


हिंगोलीत इंधनाचा तुटवडा...


नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधामध्ये आज ट्रान्सपोर्ट युनियनने संप पुकारलेला आहे. याचा सर्वाधिक परिणाम पेट्रोल पंपावर जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यात कालपासूनच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर काही पेट्रोल पंपावरील इंधन संपले आहे. हिंगोली शहरातील नाईक पेट्रोल पंपावरील इंधन संपले आहे. पाच वाजता पेट्रोल, तर आठ वाजता डिझेल साठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. परिणामी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. तर, हिंगोली शहरातील पेट्रोल साठा दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत पुरेल इतकाच असल्याची माहिती समोर आली आहे. 


नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही गर्दी...


नवीन वाहतूक काद्यायाच्या विरोधात ट्रक चालक आणि इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे.  त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी देखील पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली आहे. नांदेडमध्ये काही पेट्रोल पंपावर 2 दिवस पुरेल एवढा इंधनाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळपासून वाहनधारांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी पाहिला मिळत आहे. 


परभणीत रात्री गर्दी...


नवीन वाहतूक काद्यायाच्या विरोधात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला असल्याने वाहनधारक पेट्रोल-डीझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, परभणीत रात्री काही ठिकाणी गर्दी झाली होती. मात्र, आज सकाळी कुठेही गर्दी पाहायला मिळाली नसल्याचे चित्र आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपले...


इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारल्यानंतर कालपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री उशिरा पर्यंत अनेक पेट्रोल पंप सुरु होते. त्यामुळे काही ठिकाणी अक्षरशः पोलिसांना धाव घ्यावी लागली. तर शहरातील एका पेट्रोल पंपावर वाद आणि त्यातून एकाला मारहाण झाल्याचे देखील समोर आले. आज सकाळी देखील वाहनधारक पेट्रोल पंपावर गर्दी करतांना पाहायला मिळत आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपल्याने पंप बंद करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस; इंधन तुटवड्याचं संकट उद्भवणार?