हिंगोली:  हिंगोलीच्या (Hingoli APMC) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणामध्ये हळद आवक झाली आहे. चांगला भाव मिळतो या अपेक्षेने यावर्षीची सर्वाधिक हळद आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात त्याचबरोबर बाजार समितीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हळद विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस मुक्काम करावा लागणार आहे 


हळद विक्री करण्यासाठी  पुढील तीन दिवस लागणार 


हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 18 हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली आहे. सध्याची सुरू असलेली लग्नसराई त्याचबरोबर पेरणीचा कालावधी जवळ आल्याने शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी घाई केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद आवक झाली आहे. परंतु मनुष्यबळ त्याचबरोबर व्यापाऱ्यांची क्षमता या तुलनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या हळदीचा लिलाव आणि मोजणी एका दिवसात करणे शक्य नाही त्यामुळे ही हळद विक्री करण्यासाठी  पुढील तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.


 शेतकऱ्यांना करावा लागतोय अतिरिक्त खर्च 


 पुढील तीन दिवस शेतकऱ्यांना वाहनांचे अतिरिक्त भाडे त्याचबरोबर जेवण असा अतिरिक्त खर्च करावा लागतोय. बारा महिने शेतामध्ये कष्ट करून पिकवलेली हळद विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात तब्बल तीन ते चार दिवस मुक्काम करावा लागतो आहे. कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये हे कशाचं लक्षण मानायचं बाजार समिती प्रशासनाने यावर योग्य तो पर्याय काढावा आणि शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात मुक्काम करण्याची गरज भासणार नाही असे नियोजन करावे हीच मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. 


हिंगोली येथील हळदीचे मार्केट विदर्भात प्रसिद्ध 


मराठवाड्यासह विदर्भातील अमरावती, यवतमाळ ,अकोला, वाशिम, जळगाव या भागातील हळद मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी दाखल झाली आहे.  हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. हिंगोली जिल्ह्यालगत वाशीम जिल्हा असल्यानं या जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. राज्यात सांगलीनंतर (sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये केली जाते.


हे ही वाचा :


Waygaon Turmeric : वायगावच्या हळदीचं वेगळेपण काय?  का वाढतेय या हळदीला मागणी....