Hingoli Accident : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, एका दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये (Accident) आई-वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव असे मयत व्यक्तींचे नाव आहेत. 


हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील रहिवासी असलेले आकाश जाधव हे काल सायंकाळी आपल्या आई कलावती जाधव आणि वडील कुंडलिक जाधव यांना घेऊन वैद्यकीय कामानिमित्त रुग्णालयात निघाले होते. दरम्यान, अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे डिग्रस वाणी गावाच्या शिवारात त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये आकाश जाधव यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघात रात्रीच्या सुमारास घडला आणि या रस्त्यावरून जास्त रहदारी नसल्यामुळे जाधव कुटुंबाला रात्री कुणाचीही मदत मिळाली नाही. दरम्यान, आज सकाळी हा अपघात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाणी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाल्याने या घटनेबद्दल गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 


घटनास्थळी पोलीस दाखल...


डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी याची माहिती अपघातग्रस्त यांच्या कुटुंबियांना देऊन, मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. 


अपघातात आणखी एकाच मृत्यू...


दरम्यान, याच परिसरात आणखी एका अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी दुचाकीची धडक देत एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिग्रस पाटीजवळ घडली होती. याबाबत श्रावण लक्ष्मण घडाळे (रा. रिसालाबाजार हिंगोली) यांनी तक्रार दिली. त्यांचे भाऊ विजय लक्ष्मण घडाळे (वय 24 वर्ष) हे डिग्रस पाटीजवळ उभे होते. यावेळी औंढा नागनाथकडून येणाऱ्या (एमएच 38 एबी 7254 क्रमांकाच्या) दुचाकी चालकाने त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून विजय घडाळे यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रावण घडाळे यांच्या दुचाकीचालकाविरुद्ध फिर्यादीवरून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


सांगलीत सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! अपघातात एकीचा मृत्यू तर एक गंभीर जखमी