हिंगोली : शिंदे गटाचे हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.  


सन 2019 ते 2024 या काळात हेमंत पाटील हिंगोलीतून खासदार होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं गेलं. भाजपचा विरोध असल्याने हिंगोलीतून उमेदवार बदलत बाबूराव कदम यांना तिकीट देण्य़ात आलं होतं. मात्र त्या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांच्या आत शिंदेंनी हेमंत पाटलांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे.


विधानसभेसाठी बळ देण्याचा प्रयत्न 


हिंगोली लोकसभेची उमेदवारी हेमंत पाटील यांना जाहीर केल्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेकडून मागे घेण्यात आली होती. भाजपच्या सर्व्हेचे कारण देत त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती. पण त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शेजारच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये दोन्ही जागा या शिंदे गटाने गमावल्या. 


हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतल्यानंतर ते नाराज होते अशी चर्चा होती. आता एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जाते. तसेच आगामी विधानसभेच्या दृष्टीने हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हेमंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी बळ दिल्याची चर्चा आहे. 


हिंगोलीतील वसमतमध्ये हळद केंद्र


हिंगोलीतील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरीद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची (Balasaheb Thackeray Haridra Research And Training Center) स्थापना करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील हे पहीलेच हळद संशोधन केंद्र स्थापन झालं असून याचा मराठवाड्यासहीत अखंड महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील हळद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हळद उत्पादनाच्या सर्व समस्यांचे निराकारण करण्यासाठी हे केंद्र कार्यरत आहे.


या केंद्रामुळे हळद उत्पादनापासून विपनणापर्यंतच्या सर्व बाबी सोईस्कर होणार आहेत. त्यामुळे बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याबरोबरच मालाचे योग्य आणि चांगला बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने हळद संशोधन केंद्राचा हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
 
ही बातमी वाचा: