(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli Accident : बस आणि ट्रकचा भीषण अपघात, बसचा चक्काचूर; 10 ते 15 जण जखमी
Bus and Truck Accident : हिंगोलीमध्ये बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये 10 ते 15 जण जखमी झाले आहेत.
Bus and Truck Accident : हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli Accident) नांदेड जिंतूर महामार्गावरील वगरवाडी गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Bus and Truck Crash) झाला आहे. या अपघातामध्ये बसमधील दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींपैकी दोन ते तीन जण गंभीर असल्याचं ही समोर येत आहे. बसवर ट्रक आदळल्याने हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या पुढच्या भागाचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे.
बस आणि ट्रकचा भीषण अपघात
नांदेड जिंतूर महामार्गावरील हा अपघात एवढा भीषण होता की, बसवर ट्रक आदळल्यामुळे बस पूर्णपणे क्रॉस झाली. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, बसमधील सर्व जखमींना तात्काळ औंढा नागनाथ येथील शासकीय रुग्णालयात त्याचबरोबर काहींना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या जखमींना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी भेट देत विचारपूस केली असून तात्काळ उपचार करावेत, असे आदेश आरोग्य प्रशासनाला दिले आहेत.
नेमका कसा घडला अपघात?
हिंगोली येथे बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन बसमधील सुमारे 10 ते 15 प्रवासी जखमी झाले आहेत. हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर वाघरवाडी गावाजवळ हा अपघात झाला.स्थानिक रहिवाशी तातडीने जखमींच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. त्याच मार्गावर प्रवास करत असलेले खासदार हेमंत पाटील यांनीही जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केलं. अपघातामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी कार्यक्षमतेनं खराब झालेली वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली असून, वाहतूक स्थिती आता पूर्वपदावर आली आहे.