हिंगोली : राज्यामध्ये सर्वत्र जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसतोय. यामध्ये शेतातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना, रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे हिंगोलीतील (Hingoli) पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील (Purna Cooperative Sugar Factory) 500 मेट्रिक टन साखर या पावसामुळे भिजली आहे. पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात होता की, हे पाणी गोडाऊनमध्ये शिरेल याचा अंदाज सुद्धा कारखाना प्रशासनाला नव्हता. त्यामुळे हे साखरेचे नुकसान झाले आहे. 500 मेट्रिक टन साखर भिजल्यामुळे कारखान्याचे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, गोडाऊनमध्ये सगळीकडे साखरेचा पाक पाहायला मिळत असून, यामुळे कारखान्याचे गाळप पूर्ववत चालू करण्यासाठी तब्बल 24 तासाचा कालावधी लागला आहे. तर, पुढील काही दिवस गाळप करताना याचा अडथळा सुद्धा होणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणत नुकसान होतांना पाहायला मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार स्वरूपाच्या होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कापूस, तूर, हरभरा, ज्वारी यासह भाजीपाला आणि फळ बागांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अनेक ठिकाणी ज्वारीचे पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. हिंगोलीच्या वाई गोरखनाथ येथील शेतकरी व्यंकटेश कदम यांनी यांच्या शेतात एक महिन्यापूर्वी ज्वारीच्या पिकाची पेरणी केली होती. या ज्वारीच्या पिकावर शेतातील गुरांच्या चाऱ्याचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे खाण्याचे नियोजन नियोजन असते. परंतु, या वादळी वारे आणि पावसामुळे संपूर्ण अडीच एकर जमिनीवरील ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले आहे.
शेतकऱ्याने साकारलेले स्वप्न धुळीस मिळाले...
नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याने साकारलेले स्वप्न धुळीस मिळाले असल्याचे चित्र आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी लालबा जाधव या शेतकऱ्याच पपईची बाग वादळीवाऱ्यात आडवी झाल्याने पाच लाख रुपयांचा फटका बसलाय. लालबा जाधव यांनी त्यांच्या शेतीमध्ये एक एकर पपईची लागवड केली. या बागेसाठी मोठा खर्चही केला. मोठ्या कष्टाने बाग वाढवली. भाव यंदा दरवर्षीच्या तुलनेत चांगला असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित होते. दहा ते बारा टन माल काढणीस आला होता. त्यामुळे अंदाजे अडीच लाख रुपयांचा माल शेतात तयार होता. पण, अचानकपणे सोमवारी पहाटे वादळी वारा आणि पाऊस आल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गान हिरावून घेतला.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील क्षेत्र घटले होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली होती. मात्र जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा पेरणी केलेल्या क्षेत्राला बसला आहे. शेतांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या गहू आणि हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: