Maharashtra Weather Today : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तास राज्यात पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 


विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे. निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून राज्याच्या दक्षिण भागात सक्रिय झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्याने परिणामी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. 






बळीराजाची चिंता वाढली


पुढील दोन-तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील 48 तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.


पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम


अरबी समुद्रालगत चक्रावार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदियामध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काही दिवसात वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.