Health Tips : आजकालच्या काळात बदलती जीवनशैली, अपुरी झोप आणि वेळी-अवेळी खाणं यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतोय. परिणामी आम्लपित्त (Hyperacidity) च्या त्रासाचं प्रमाण वाढलं आहे. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 

    


वेळी-अवेळी खाणं तसेच अपुरी झोप यामुळे आरोग्याचा संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. आम्लपित्ताचा त्रास नेमका कशामुळे होतो? आम्लपित्ताची कारणं कोणती? आणि यावर उपाय काय? या संदर्भात सांगताना, डॉ. धनश्री चाळके (BAMS, चिपळूण) सांगतात की, आपण रोज जे अन्न खातो त्याला आपण आहार म्हणतो. या आहारा संदर्भात पाळायचे काही नियम असतात. 


जे जिभेला रूचेल आणि पोटाला पचेल ते आपण खावं. ही आजकालच्या खवय्या संस्कृतीतील सर्वांचीच मानसिकता झाली आहे. आजकालच्या स्पर्धायुगामध्ये टेन्शन, काम, जबाबदारी, कुटुंब या सगळ्या गोष्टींमुळे माणासाचं जीवन अतिशय संघर्षमय झालं आहे. त्यामुळे तणावयुक्त जीवन आणि व्याधीग्रस्त शरीर या दोन समस्या घेऊनच प्रत्येकजण आपला जीवनक्रम व्यतीत करतोय. त्यामुळे आम्लपित्ताची समस्या वाढत चालली आहे. 


आम्लपित्ताची कारणे कोणती? 


आम्लपित्ताची कारणं थोडक्यात HURRY, WORRY, CURRY आहे. धावपळ, अतिशय चिंता आणि चमचमीत मसालेदार पदार्थ खाणे ही आम्लपित्ताची मूळ कारणं आहेत. 


आयुर्वेदाप्रमाणे बघायचं झालं तर अनियमित आहार-विहार. 


विहारामध्ये रात्री जागरण, अति चिंता, अति शोक, अति क्रोध या गोष्टी आम्लपित्तासाठी कारणीभूत ठरतात. 


आहारामध्ये - अति आंबट, अति खारट, अति तिखट पदार्थ खाणे. त्याचप्रमाणे तूर, हरभरा, मसूरडाळ, दही, लिंबू, लोणचं यांचं अति प्रमाणात सेवन करणे. अति चहा, अति कॉफी, अवेळी जेवणे, घाईघाईत जेवणे, तंबाखूसेवन, मद्यपान आणि नियमित पोट साफ न होणे या गोष्टी आम्लपित्ताला कारणीभूत ठरतात. 


आम्लपित्ताची लक्षणे कोणती?



  • छातीत जळजळणे

  • उलटी मळमळ वाटणे 

  • छातीत दुखणे

  • पोट गच्च वाटणे 

  • पोट साफ न होणे 

  • डोकं गरगरणे 

  • तोंडाला पाणी सुटणे 

  • ढेकर येणे 

  • घशात आंबट पाणी येणे 

  • तीव्र डोकेदुखी 


आम्लपित्तावर घरगुती उपाय कोणते?


1. सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे निदान परिवर्ज्य 


2. अॅन्टासिड गोळ्या घेतल्याने तात्पुरता आराम मिळतो. मात्र, ठराविक कालावधीनंतर या गोळ्यांनी आराम मिळेनासा होतो. कत्यामुळे ते टाळावे. 


3. सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे. यामुळे पित्ताचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दिसून येतो.


4. सकाळी आणि रात्री एक चमचा साजूक तूप एक कप दुधातून घेतल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. ते शक्य नसल्यास किमान 1-2 चमचे तुपाचा समावेश जेवणात करावा. 


5. सकाळचा नाश्ता भरपेट असावा. दुपारी 12 च्या दरम्यान जेवण आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 च्या आत घेणं शक्य झालं तर आपल्याला बऱ्याच प्रमाणत आम्लपित्ताचा त्रास कमी झालेला दिसून येतो. 



आम्लपित्त टाळण्यासाठी काय कराल? 


1. एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणं टाळावे. 


आयुर्वेदामध्ये पित्तावर रामबाण चिकित्सा सांगितली आहे. ती म्हणजे विरेचन. विरेचन म्हणजे प्रकुपित पित्त जे आहे ते मलप्रवृत्तीद्वारे शरीराबाहेर टाकणे याला विरेचन म्हणतात. पित्त हा व्याधी नाही विकार आहे. त्यामुळे 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा वैद्यकीय सल्ल्यानुसार विरेचन घेणं गरजेचं आहे. विरेचनामुळे बराच फायदा होतोय. पूर्वीच्या काळी म्हातारी माणसं एरंडेल तेल घ्यायची हा त्यातलाच एक प्रकार आहे. 


सप्टेबर-ऑक्टोबरचा हा जो काळ आहे. हा निसर्गत: पित्तप्रकोपाचा काळ आहे. त्यामुळे या काळात जर विरेचन घेतलं तर ते आपल्यासाठी अतिशय फायद्याचं ठरू शकतं. 


आपण स्वत: आहार विहारामध्ये काही बदल केले आणि काही पथ्य पाळली तरी आम्लपित्तावर मात करता येते. 


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या बातम्या : 


Health Tips : मूळव्याध हा आजार नेमका कशामुळे होतो? मूळव्याध टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला