सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडवळच्या नागनाथाची भली मोठी कमान सर्वांच लक्ष वेधून घेते. सोलापूरपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावरची ही भव्यदिव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे. महामार्गापासून 5 किलोमीटरवर असलेल्या वडवळ गावातलं नागनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरुन भाविक गर्दी करतात. वडवळचा नागनाथ म्हणजे मोहोळ तालुक्याचं ग्रामदैवत. केवळ ग्रामदैवतच नाही, तर भाविकांचं श्रद्धास्थानही.

हेमाडपंथी शैलीचं बांधकाम

हेमाडपंथी बांधकाम शैलीच्या या मंदिराची वास्तुकला पाहता क्षणी डोळ्यात भरते. बाराव्या शतकात याची उभारणी झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातो. नागनाथ महाराज शंकराचा स्वयंभू अवतार समजला  जातो. ज्याप्रमाणे वारकरी पंढरीची वारी करतात, तशीच नागनाथ महाराजांची अमावस्येची वारी असते. या वारीत हजारो भाविक सहभागी होतात.  नागनाथ महाराजांची  वार्षिक यात्रा चैत्र महिन्यात असते.

वर्षातले बारा महिने नागनाथाचं हे मंदिर भाविकांच्या गर्दीने भरुन गेलेलं असतं.  महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातल्या हजारो भाविकांचं ते कुलदैवत आहे. मनोकामना पूर्ण झालेले भाविक नागनाथाच्या या पुरातन मंदिरात येऊन नवस फेडतात.  वडवळ गावासह पंचक्रोशीतली जनता मंदिरात होणाऱ्या नित्योपचारात सहभागी होते.
महिलांना नागनाथाचा आधार
नागनाथ महाराजांवर महिलांची मोठी श्रद्धा आहे. शंकराचा अवतार असलेला हा नागनाथ म्हणजे समस्त महिलांना संकट काळात तारणारा आपला भाऊच वाटतो. प्रत्येक बहिणीचा तो पाठीराखा आहे अशी महिला भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी नाग पंचमीला भावाचा उपवास म्हणून नागनाथांच्या नावे महिला उपवास धरतात. राज्यात कुठेही असोत नागनाथांचा भक्त नतमस्तक व्हायला वडवळला आवर्जून येतो.

वडवळच्या नागनाथ महाराजांची आख्यायिका

नागनाथ महाराजांच्या अस्तित्वाची आणि वडवळ गावच्या स्थापनेची आख्यायिका कमालीची रंजक  आहे. चंद्रमौळीचे हेगरस हे नागनाथांचे निस्सीम भक्त होते. वडवळ हे घनदाट अरण्य होतं. भक्त हेगरसच्या भक्तीने भारावून जात नागनाथ वडवळ गावी आले. नागनाथांनी गावात येताच एका वाळलेल्या वडाची फांदी रोवून पाणी घातलं. त्या वाळलेल्या झाडाला संजीवनी मिळाली आणि पालवी फुटली. या चमत्कारामुळे नागनाथ महाराज पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले.  त्यांचा भक्त परीवार प्रचंड वाढला. इथेच नागनाथांनी अवतार कार्याची समाप्ती केली. भक्त हेगरसाने प्रत्यक्ष नागनाथ महाराजांना वडवळ गावी आणले अशी कहाणी प्रसिद्ध आहे.

प्राचीन मंदिराचा इतिहास

नागनाथ महाराजांचं मंदिर प्राचीन आहे. तसंच महाराजांची मूर्ती डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात दक्षिणेला महाराजांचं दर्शन घडतं. एक जागृत देवस्थान अशी संपूर्ण महाराष्ट्रात वडवळच्या नागनाथाची ख्याती आहे. महाराजांच्या दरबारातून कोणीच रिकाम्या हाती जात नाही, असा भाविकांचा विश्वास आहे.

नागनाथ महाराजांचा दृष्टांत झालेल्या खर्गे परिवाराला या देवस्थानात मोठा मान आहे. यात्रेतील सगळे प्रमुख विधी खर्गे महाराजांच्या सानिध्यात पार पडतात. खर्गे महाराजांच्या भाकणूकीने यात्रेचा समारोप होतो. गेल्या नऊशे वर्षांपासून चालत आलेली ही  परंपरा आहे. नागनाथ महाराज खर्गे  यांच्या रुपात प्रत्यक्ष भाविकांना भेटतात अशी भावना सर्वश्रुत आहे.
सर्वधर्म समभाव जपणारं देवस्थान
श्रावणी सोमवार, नागपंचमी आणि दसऱ्यादिवशी दिवशी भक्तांची गर्दी  होते.  यात्रेत होणारा सर्वधर्म समभावाचा गजर आणि सर्व जाती धर्माच्या भाविकांची उपस्थिती यातच नागनाथ महाराजांचं माहात्म्य अधोरेखित होतं. मंदिरासमोरच मस्जिद असल्याने अगोदर शेख नसिरुद्दीन बादशहाचा जयजयकार होतो, नंतर हर हर महादेवाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून जातं.

सीमोल्लंघनावेळी पालखी बाहेर आल्यावर आरती करण्याचा पहिला मान मागासवर्गीय महिलेचा असतो. यामुळेच महिला भाविकांची संख्या यात्रेत लक्षणीय ठरते.

पाहा व्हिडीओ :


ग्रामदेवता : सेलूवासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धीविनायक

ग्रामदेवता : मादळमोही गावचं श्रद्धास्थान श्री मोहिमाता

ग्रामदेवताः बार्शीचं श्रद्धास्थान श्री भगवंत

ग्रामदेवताः अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी

ग्रामदेवता : आदिवासींचं कुलदैवत, बर्डीपाड्याची देवमोगरा देवी

ग्रामदेवताः नाशिक जिल्ह्यातील नांदगावची ग्रामदेवता एकवीरा देवी

ग्रामदेवता : हातकणंगलेतील पट्टणकोडोलीचा श्रीबिरदेव

ग्रामदेवता: धुळ्याच्या साक्री तालुक्यातील श्रीधनदाई देवी

ग्रामदेवता : सांगलीतील विटावासियांचं ग्रामदैवत श्रीभैरवनाथ

ग्रामदेवता: परभणीतील मानवतचा मोठा मारुतीराया