मुंबई : मागील तीन महिन्यांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निघणारा मराठा क्रांती मूक मोर्चा अखेर मुंबईत मौन सोडणार आहे. येत्या रविवारी 6 नोव्हेंबर रोजी सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाईक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीने केली आहे.


कोपर्डी बलात्कारातील नराधमांना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन यावेळी सरकारला सादर केलं जाईल, असंही समितीने सांगितलं.

सोमय्या मैदानावरुन सकाळी 9 वाजता निघणारी ही बाईक रॅली सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्टेशनसमोर पोहोचेल. सीएसटीला छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिला जाईल. तसंच कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहून रॅलीची सांगता होईल.

बाईक रॅली कशी असेल?



महिला या बाईक रॅलीचं नेतृत्त्व करणार आहे. बाईक चालकाला हेल्मेट घालणं बंधनकारक असेल तर मागे बसणारा भगवा फेटा परिधान केलेला असावा. महिलांच्या बाईकवर काळा आणि पुरुषांच्या बाईकवर भगवा झेंडा असावा. यावेळी वाहतुकीच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करणं बंधनकारक असेल. महत्त्वाचं म्हणजे या रॅलीदरम्यान हॉर्न वाजवले जाणार नाहीत किंवा घोषणा दिल्या जाणार नाही. त्यामुळे मूक मोर्चाप्रमाणे ही बाईक रॅलीही मूकच असेल.