मंदिराची रचना
राजूरेश्वराचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून, या मंदिराचा उल्लेख गणेश पुरणातही आढळतो. मंदिरात प्रवेश करताच मोठा सभामंडप आणि पुढे गर्भगृह आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला की, बाप्पांची स्वयंभू मूर्ती गणेशभक्तांचे मन मोहीत करते. सध्या, मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु असून मंदिराचा गाभा कायम ठेऊन नवीन बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हे संपूर्ण मंदिर पांढऱ्या संगमवरी दगडात बांधण्यात येतं आहे. याच मंदिरात बाजूला शिव आणि अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. शिव मंदिराची कलाकुसर म्हणजे हेमाडपंथी वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे.
ऐतिहासिक महत्त्व
प्रचीन भारतातील 16 समृद्ध आणि वैभवशाली शहरांपैकी जवळच असलेल्या भोगवर्धन अर्थात आजचे भोकरदन या शहराचा उल्लेख ही इतिहासात आढळतो. यादव काळानंतर पेशवाईत या मंदिराची लोकप्रियता चारीही दिशांना वाढत गेली. पेशव्यांचे आराध्य दैवत असल्याने पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला भेट देऊन पंचधातूची घंटा गणरायाला अर्पण केली. आजदेखील ही घंटा येथे पहायला मिळते.
अध्यात्मिक महत्त्व
गणेश पुराणात याची एक आख्यायिका सांगितली जाते. वरणेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने गणेशाची आराधना केली. राजाच्या भक्तीनं गणेश प्रसन्न झाले, आणि त्यांनी पुत्रप्राप्तीचा वर राजाला दिला. पुढे काही काळानंतर राजाला मुलगा झाला. मात्र हा मुलगा कुरुप असल्याने त्याला सांभाळणे राजाला अपमानाचे वाटू लागले. त्यामुळे त्याने आपल्या मुलाला येथीलच वनात सोडून दिले. नंतर या मुलाचा सांभाळ अगस्ती ऋषींनी केला. त्यांच्या देखरेखी खाली याने सर्व विद्येत शिक्षण घेतले. पुढे याच मुलाने आपला पराक्रम दाखवत सिंदूरासुराचा वध केला. यामुळे आपली चूक कळली आणि तो अगस्ती ऋषींना शरण गेला. यानंतर त्यांनी आपल्या मुलाला या गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला. तो वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच हा राजूरेशवर.
राजूरेश्वराचा वार्षिक उत्सव
संपूर्ण भारतात गणपतीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. यात मोरेगाव, चिंचवड आणि राजूर हे पूर्ण तर पद्मालय हे अर्धे पीठ मानलं जातं. यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आहे. माघ शुद्ध चतृर्थीला राजूर येथे गणेश जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम असतो. यावेळी प्रवचन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमे मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. यावेळी गणेश भक्तांनीही मोठी गर्दी केलेली असते.
व्हिडीओ पाहा