परभणी : परभणी जिल्ह्यातल्या मानवत या गावचं मारूती हे ग्रामदैवत आहे. गावातील बहुतेकांच्या दिवसाची सुरुवातच या मारुतीच्या दर्शनाने होते.

मोठी बाजारपेठ असलेल्या या शहरात अनेक मंदिरं आहेत. पण वेशीतला मोठा मारुती या ग्रामदेवतेचे मानवतवासियांच्या जीवनात विशेष महत्व आहे. जुन्या मानवतच्या वेशीत हे भव्य मंदिर असून जुन्या दगडी बांधकामाला आधुनिकतेचा साज या ठिकाणी पाहायला मिळतो. मंदिराच्या मूळ स्वरुपात आता अनेक बदल झाले आहेत. मंदिराचा कळस, कळसाच्या खाली वेगवेगळ्या देवी-देवता आणि संतांच्या मूर्ती चितारण्यात आल्या आहेत. तसंच आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

मारुती मंदिरातील दुर्मिळ लक्ष्मीची मूर्ती

या मंदिरात असलेल्या दोन मारुतीच्या मूर्ती आणि मधोमध लक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. मारुतीच्या मंदिरात लक्ष्मीची मूर्ती दुर्मिळ असते. इथं बोललेला नवस पूर्ण होतो, असा भाविकांची श्रद्धा आहे.

मारुती मंदिराला आठशे वर्षांचा इतिहास

ग्रामदैवत असलेल्या मारुतीच्या या मंदिराची स्थापना साधारणतः सातशे ते आठशे वर्षांपूर्वी झाली असावी असं सांगितलं जातं. आठशे वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराचा आतापर्यंत तीनवेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. याठिकाणी गाव आणि परिसरातील भक्तांचा मोठ्या प्रमाणात वावर पाहायला मिळतो. वर्षभर भक्तांचा मेळा लागत असला तरी उत्सव म्हणून हनुमान जयंतीला परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याकाळात परिसरातही लोकांसोबत आजूबाजूच्या परिसरातील लोकही आपले नवस बोलण्यासाठी तर काहीजण नवस पूर्ण करण्यासाठी हजेरी लावतात.

मानवतच्या मारुतीची आख्यायिका

गावात राहणाऱ्या झारे कुटुंबातील एक पुरुष हे मारुतीचे मोठे भक्त होते. मानवतपासून जवळ असलेल्या पिंपळगाव या गावात जाऊन ते रोज मारुतीची सेवा करत. पण वय वाढल्यानं त्यांना थकवा येऊ लागला. पण तरी देखील त्यांनी देवाच्या सेवा करणं सोडलं नाही. त्यांच्या या भक्तीभावावर मारुतीराया प्रसन्न झाले आणि त्यांनी झारे यांना त्यांच्या घरी येऊन विराजमान होण्याचे मान्य केले. पण मला घेऊन जात असताना मागे पाहिल्यास मी तिथेच स्थापित होईल. अशी अटही घातली. त्यानुसार देवांनी झारे यांच्यासोबत प्रवास सुरु केला. पण ऐन गावाच्या वेशीत आल्यावर झारे यांनी न राहून मागे पाहिले आणि अटीनुसार मारुतीची स्थापना वेशीतच करावी लागली.

मानवतचे ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदिराचा परिसर आजही विकासापासून दूर आहे. येथे येणारे भक्त आणि लोकांची संख्या पाहता याठिकाणी मोठी कामे होऊन परिसराचा विकास होणे गरजेचे आहे.

पाहा व्हिडीओ :