औरंगाबाद: चाळीसगाव रस्त्यावरील उपळा गावात असलेलं कालीमातेचे मंदिर म्हणजे औरंगाबाद जिल्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत आहे. निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली. निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक मंदिर.


कन्नड शहरापासून अवघ्या 9 कि.मी. अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालीमातेचे मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली. मुळेचे कोलकात्याचे रहिवाशी असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी राजवैभवाचा त्याग करून 1968 रोजी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीला आले. तब्बल 19 वर्षे इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांनी कालीकामातेचे एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला. मंदिरासाठी जागा विकत घेऊन त्यावर हे मंदिर उभं केलं.

कालीमठ मंदिर हे आधुनिक स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर 14 एकराच व्यापलेलं असून परिसरात आंब्याची अनेक झाडे आहेत. मंदिर बांधणीसाठी 9 अंकाला महत्व दिले आहे. मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण झाले. प्रत्येक बांधकामाची बांधणी ही नऊच्या पटीत आहे. ओटा, कॉलमचे अंतर, प्रदक्षिणेचा मार्ग, गाभारा, सभामंडप आणि मंदिरावरील कळसांची संख्यादेखील नऊ आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कन्नड ते कालीमठ अंतरदेखील 9 कि.मी. आहे.

मंदिरात प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती देवीची प्रसन्नमुर्ती. मुर्तीच्या एका हातात रक्तपीस नावाच्या राक्षसाचे शीर, तर दुसऱ्या हातात तलवार आहे. देवीच्या पायाखाली निद्रिस्त शंकर आहेत. कालिकामातेची 6 फूट उंचीची ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाने साकारण्यात आली आहे. मंदिराच्या पाठीमागे स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांची समाधी आहे.

देशभरातून कालीकामातेच्या दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सतत या ठिकाणी असते. मंदिरात रोज नित्यनेमानं सकाळी साडेपाच वाजता अभिषेक ,पुजा, आरती करण्यात येते. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी महाआरती होते. या मंदिरात केवळ पोर्णिमा आणि आमावस्येला  भक्तांना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. गुरूपोर्णिमा, महाशिवरात्री, नवरात्रात मोठा उत्सव असतो.

मंदिराची किर्ती दिवसेंदिवस वाढत असून, इथं भाविकांची गर्दीही वाढली आहे. देशभरातून इथं भाविक येतात आणि कालिकामाते चरणी लीन होतात.