चेन्नई: तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधनानंतर प्रसिद्ध अभिनेते, संपादक, राजकीय विश्लेषक आणि जयललिता यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार चो रामास्वामी यांचं आज पहाटे निधन झालं. ते 82 वर्षाचे होते. जयललिता यांना दाखल करण्यात आलेल्या अपोलो रुग्णालयातच त्यांनाही दाखल करण्यात आलं होतं. प्रदीर्घ आजारानं त्यांचं आज पहाटे 4:15च्या सुमारास निधन झालं.


ऑगस्ट 2015 साली जेव्हा रामास्वामी रुग्णालयात दाखल होते त्यावेळी जयललिता यांनी त्यांची भेट घेतली होती. चो रामास्वामी यांचं 'तुघलक' हे नियतकालिक खूपच प्रसिद्ध होतं. या नियतकालिकातून ते अनेकदा राजकीय नेत्यांचा खरपूस समाचारही घेत असे.



दरम्यान, काल संध्याकाळी जयललिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर तमिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.