मुंबई: ''मी भाजपसोबत नाही, तर भाजप माझ्याबरोबर आहे. त्यामुळे संविधानाला जर कुणी धक्का लावला, तर तर आम्ही सरकारलाही धक्का लावू,'' असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी मंत्री उपस्थीत होते.
बाबासाहेबांनी संविधान लिहीलं नसतं, तर देश मागासच राहिला असता, असे सांगून आठवले पुढे म्हणाले की '' बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानामुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला. तसेच बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळेच नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झालो.''
जातीभेदावरुन ते म्हणाले की, ''समाजाला जोडायचं असेल, तर आंतरजातीय विवाह गरजेचे असल्याचं मत बाबासाहेबांनी व्यक्त केलं होतं. पण त्यामुळे आज आमच्या तरुणांचा खून होत आहेत. पण कितीही तलवारी चालल्या तरी आमचा समाज अबाधित राहणार.''
दलित चळवळीतील पक्षांच्या एकत्रिकरणासंदर्भात ते म्हणाले की, ''आपल्याला एकतेची गरज आहे. एकाच ठिकाणी अनेक सभा नको. जर दलितांची एकच पार्टी होणार असेल, तर मी तडजोड करायला तयार आहे.''
यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आरपीआयकडून उभे असल्याचा पुनरुच्चार करुन, त्यांचं अभिनंदन करायला अमेरीकेला जाणार असल्याचे सांगितले.