धुळे: धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे श्रीधनदाई देवी. यादेवीची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. नाशिक, धुळे आणि खान्देशातल्या इतर जिल्ह्यातल्या 71 कुळांचे हे कुलदैवत. साक्री तालुक्यातल्या म्हसदी गावापासून दीड किमीवर असलेलं आणि विश्वस्त आणि भाविकांच्या सहकार्यातून साकारलेलं हे मंदीर आज सगळ्यांचं श्रद्धास्थान झालं आहे.


या धनदाई देवीची आख्यायिकाही मजेदार आहे. सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले. त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदिशक्तीची प्रार्थना केली. भक्तांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन धनदाई, सप्तशृंगी, म्हाळसा, एकविरा, चिराई, भाटायी, रेणुका अशा सप्तर्षी भगिनींच्या रूपाने आदिशक्ती खान्देशात अवतरली. या सप्त भगिनींनी दैत्यांना युद्धाचे आवाहन दिले. दैत्य पराभूत झाले. वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. रेड्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी जंगलामध्ये लपून बसले. तेव्हा या साप्तभगिनी त्यांचा पाठलाग करत त्या जंगलात पोहचल्या व रेड्यांच्या रुपात असलेल्या दैत्यांचा नाश केला.

देवरे कुळातील आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे नायगावी वास्तव्यास आले. त्यांनी तेथे कुल संरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली. नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टीना कंटाळून तिथून जवळचा असलेल्या नदीपलीकडील त्याकाळचे म्हीसपाडा म्हणजेच आजचे म्हसदी या ठिकाणी स्थलांतर केले. त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यानपिढ्या मूर्तीला शेंदूर लावल्यामुळे ती मूर्ती लुप्त झाली त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्षातही आले नाही. कालंतराने हे देवस्थान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्य असणारे भिल्ल त्या देवस्थानचा सांभाळ करू लागले. इसवी सन १९६४मध्ये धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले.



आज याठिकाणी धुळे जिल्ह्याप्रमाणेच नाशिक, जळगाव, नंदुरबार तसेच गुजरात राज्यातील देखील भाविक येतात. नवरात्रोत्सव  तसेच चैत्र महिन्यातील देवीची यात्रा हे दोन मोठे उत्सव असतात. गावातील काही युवकांनी १९७३-७४च्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. या मंदिर परिसरातील दोनशे मीटर क्षेत्रात देवीला कुठल्याही प्राण्याचा बळी देण्यास मनाई असतांना देखील काही भाविक प्राण्यांचा बळी देतात. देवीला केवळ वरण बट्टीचा नैवद्य देण्यासाठी जनजागृती सुरू  आहे.

मंदिर परिसरात सभामंडप, यासह भाविकांना धार्मिक विधी करता यावा यासाठी देखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे येथे भाविकांची गर्दी आढळून येते. अनेक भाविक तर वर्षानुवर्ष देवीच्या दर्शनाला येत असतात. धनदाई देवीचं रूप जागृत आहे. इथं बोललेल्या नवसांचे तर भाविकांना मोठे अनुभव आल्याचं भाविक सांगतात.

देवस्थानाच्या उत्कर्षासाठी ग्रामस्थांचा सहभाग ही मोठा आहे. त्यामुळे मंदिराच्या प्रत्येक कामात आपल्या परीने ग्रामस्थ देत असलेलं योगदान मंदिराच्या ट्रस्टचे सदस्य होण्यासाठी जी चढाओढ पाहायला मिळते. ती इथं अजिबात दिसून येत नाही.

VIDEO: