सांगोला : पूर्वीच्या माणदेशातील अत्यंत महत्वाचे ठिकाण असलेल्या सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिका माता मंदिर अनेक कारणांसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे . छत्रपती राजाराम यांना नामधारी करून सत्तेची सर्व सूत्रे पेशव्यांच्या ताब्यात ज्या ठिकाणी आले ते हेच मंदिर आहे.

अंबिका मातेचं मंदिर सांगोल्याला माणदेशाशी जोडणारी नाळ म्हणजे आहे. माणदेश हा कायमच संघर्षाचा प्रदेश होता, निजामशहा, आदिलशहा, मोगल आणि मराठा यांच्यासोबत पेशवाई आणि ब्रिटिशांचा काळ देखील या प्रदेशाने अनुभवला. अंबिका मंदिर या सर्व इतिहासाचं मुकसाक्षीदार आहे .

गावकऱ्यांच्या मते, हे मंदिर 14 व्या शतकातलं आहे. मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्टय म्हणजे एकाच सिंहासनावर रूढ असलेली अंबिका माता, तुकाई अर्थात तुळजाभवानी आणि औंधची यमाई माताही येथे विराजमान आहे.

मंदिराचा शिवकालीन इतिहास

मूळ मंदिर हे यादवकालीन असून इथे फक्त गाभाराच होता. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यावर सभामंडप आणि कमान बांधण्यात आली. गावाचं मूळदैवत ही अंबिका माता होती. पण या भागावर मराठ्यांचं राज्य असताना महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीची मूर्ती बसविण्यात आली. त्यानंतर पेशवाईच्या काळात औंधच्या यमाई मातेची मूर्ती बसविल्याचे ग्रामस्थ सांगतात. पण असं असलं तरी अजून याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

या मंदिराशिवाय येथे पुरातन धर्मशाळा देखील आहे. मंदिर परिसरात चिंतामणी, नागनाथ या दैवतांसोबत मारुतीचंही मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले अशी खबर मोगलांना मिळाली. मोगल शिवाजी महारांजावर हल्ला करण्यासाठी आले मात्र महाराज न आढळल्याने संतापून मोगलांनी या मंदिराची नासधूस केली, असं सांगितलं जातं.

कालांतराने पुन्हा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हे मंदिर अतिशय जागृत असल्याने पूर्वी या परिसरात काही तपस्वींनी समाधी घेतल्याचं ग्रामस्थ सांगतात. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करताना बसलेल्या साधूंचे सांगाडे येथील गुरव आणि इतरांनी पाहिल्याचे सांगितलं जातं.

एकाच सिंहासनावर तिन्ही माता रुढ

मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या हाताला अंबिका माता, मध्ये तुकाई माता आणि उजव्या बाजूला यमाई मातेच्या मूर्ती एकाच सिंहासनावर बसविलेल्या आहेत. गाभाऱ्यासमोर देवीचे वाहन असलेली सिंहाची मूर्ती असून समोर दोन दीपमाळा आहेत .

देवीच्या समोर सभामंडपाला चिटकून यज्ञकुंड असून यात्रा काळात येथे आहुत्या दिल्या जातात. मंदिराच्या चारही भिंतींवर पुराणकाळातील शिल्पं कोरण्यात आली आहेत. येथे असलेल्या चबुतऱ्याखाली मोठ्या योगी पुरुषाची समाधी असल्याचं सांगितलं जातं.

मंदिराचा विकास करण्याची गरज, भाविकांची मागणी

मंदिरात प्रवेश करतानाच सुरुवातीला श्रीचिंतामणीचं दर्शन होतं. यानंतर नागनाथाचं दर्शन घेऊन मातेच्या मंदिराकडे भाविक मार्गस्थ होतात. मंदिराच्या प्रवेशाच्या ठिकाणीच मोठी वेस बांधण्यात आली असून या वेशीवरील खोल्यात यात्रा समितीचे कार्यालय आहे.

पूर्वी देवीची दगडी रथातून मिरवणूक काढली जात असे. आता या रथाची फक्त चाके शिल्लक असल्याने ती एका कट्ट्यावर बसविण्यात आली आहेत. बारा महिने पाणी असणारी मंदिराची विहीर दुर्लक्षामुळे अस्वच्छ झाली आहे . मंदिराचा कळस धोकादायक बनला असून याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मंदिराला संरक्षक भिंत नसल्याने धार्मिक कार्यक्रम करण्यास अडचणी येतात. त्यामुळे येथे भिंत बांधण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

चैत्र महिन्यात या मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते. दुर्गाष्टमीला येथील भक्त मंडळ जप तप करतात. याशिवाय दर मंगळवार आणि शुक्रवारी पूजा आरती होते. शारदीय नवरात्र आणि पौष महिन्यातील शाकंबरी नवरात्रामध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम साजरे होतात.

पाहा व्हिडिओ :

ग्रामदेवता: देवरुखवासियांचं श्रद्धास्थान सोळजाई माता


ग्रामदेवता : सेलूवासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धीविनायक


ग्रामदेवता : मादळमोही गावचं श्रद्धास्थान श्री मोहिमाता


ग्रामदेवताः बार्शीचं श्रद्धास्थान श्री भगवंत


ग्रामदेवताः अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी


ग्रामदेवता : आदिवासींचं कुलदैवत, बर्डीपाड्याची देवमोगरा देवी


ग्रामदेवताः नाशिक जिल्ह्यातील नांदगावची ग्रामदेवता एकवीरा देवी


ग्रामदेवता : हातकणंगलेतील पट्टणकोडोलीचा श्रीबिरदेव


ग्रामदेवता: धुळ्याच्या साक्री तालुक्यातील श्रीधनदाई देवी


ग्रामदेवता : सांगलीतील विटावासियांचं ग्रामदैवत श्रीभैरवनाथ


ग्रामदेवता: परभणीतील मानवतचा मोठा मारुतीराया