अकलूजमध्ये ग्रामपंचायत असली तरी कोणत्याही मोठ्या शहरांशी स्पर्धा करेल अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. राजकीयदृष्ट्या कायम सत्तेत राहिल्याने याचा फायदाही या गावाला मिळाला. पण येथील आजचे मंदिर पहिले तर एवढ्या गोंगाटात देखील अतिशय शांत आणि पावित्र्य जपत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेली अकलाई माता
नीरा नदीच्या काठावरील शांत भागात अकलाई माता अकलूज मध्ये विसावली आहे . मंदीराच्या प्रवेशाच्या ठिकाणी भव्य कमान, अतिशय रेखीव आणि आकर्षक पद्धतीने बांधलेले दगडी मंदिर, उंच कळस, समोरची भव्य दगडी दीप माळ, संपूर्ण मंदीर परिसर संरक्षक भिंतीने बंदिस्त केलेला, मंदीराच्या वाटेवर पायघड्या घातलेले बारीक हिरवे गवत, पायऱ्या चढून गेल्यावर उभारलेला भव्य सभा मंडप आणि गाभाऱ्यात अकलाई मातेची प्रसन्न मूर्ती... हे सर्व पाहताच कोणत्याही भाविकाचं मन हरपून जातं.
मंदीर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात अली असून त्याच्याखाली विविध आकाराचे कट्टे बनवले आहेत. या ठिकाणी भाविक सावलीत या रमणीय ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात . पूर्वीचे मंदीर हे अतिशय छोटेखानी आणि मातीचे बांधलेले होते.
पूर्वजांच्या सांगण्यानुसार 1000 ते 1200 वर्षांपूर्वीचे हे मंदीर असल्याचं बोललं जातं. काशी खंडात देखील या मंदिराचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना जुन्या मंदीराचे तैलचित्र या ठिकाणी लावण्यात आले आहे.
सध्या या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येतो. बांधकामासाठी आतापर्यंत 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दर्शनाला आणि मुक्कामाला येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा उभारण्यात अली असून अजूनही 5 ते 6 कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत .
देवीच्या अख्यायिका
पुराणकाळात अंकलेश्वर हा दानव ऋषी मुनींना त्रास देऊ लागल्यानंतर त्यांनी पार्वती मातेची आराधना केली आणि पार्वती मातेने अकलाई देवीचे रूप घेऊन या अंकलेश्वराचा या परिसरात वध केल्याची मूळ कथा या मंदीराबाबत सांगितली जाते.
काही वर्षांपूर्वी नीरा नदीला पूर आला होता. यावेळी जनावरे चरणाऱ्या गुराख्याच्या गाईच्या पायात काही तरी अडकल्यावर त्याने काय हे पाहताना ही अकलाई मातेची मूर्ती आढळली.
गुराख्याने ती बाहेर काढली. त्याचवेळी गावच्या पाटलाला देवीने दृष्टांत देत आपल्याला अकलूजमध्ये स्थापन करण्यास सांगितल्यावर शेकडो वर्षांपूर्वी हे मंदिर उभारल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र पुराणातील काशी खंडासोबत यादवकाळ आणि छत्रपतींच्या काळात देखील अकलूजचा उल्लेख आढळतो.
या मंदीराला नवरात्राच वेगळंच सौंदर्य लाभतं. आश्विन शुद्ध नवरात्रात नऊ दिवस विविध कार्यक्रम साजरे केले जातात. कोजागिरीपूर्वी 3 दिवस देवी मंचकी निद्रेला जाते आणि कोजागिरीला दुधाचा नैवेद्य दाखवून देवीला जागे करण्यात येते. यानंतर गावातील भाविकांच्या वतीने महाप्रसादाचं, भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं.
VIDEO :
ग्रामदेवताः