दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत कौतुकास्पद पायंडा पाडला. त्यांनी कोणतंही थाटामाटात सेलिब्रेशन न करता महाराष्ट्रातील साम्यवादी चळवळीतील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागाची ओळख करुन देण्यासाठी पुस्तक निर्मितीची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेतून अनेक लढाऊ कार्यकर्त्यांचं धगधगतं प्रेरणादायी आयुष्य पुस्तकांच्या माध्यमातून समोर आलं. कॉम्रेड पानसरेंनी असा प्रयोग केला नसता, तर कदाचित अनेक कार्यकर्त्यांवर फार लिहिलंही गेलं नसतं. ‘माझ्या आईची गोष्ट’ही त्याच संकल्पनेचा एक भाग.

सिंधुदुर्गात मायनिंग आणि शेतकऱ्यांची जमीन बळकावणाऱ्या प्रकल्पांविरोधात जनआंदोलन उभारणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या वैद्यही पाटकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘माझ्या आईची गोष्ट’ हे पुस्तक आहे. एक सर्वसामान्य गृहिणी ते बेडर लढाऊ कार्यकर्ती असा प्रवास यातून त्यांच्याच मुलाने म्हणजे डॉ. रुपेश पाटकर यांनी मांडला आहे.

खरंतर हे पुस्तक काही चरित्र किंवा आत्मचरित्र नाही. हे पुस्तक म्हणजे प्रेरणादायी संघर्षांचा कोलाज आहे. धगधगत्या घटनांची नोंद आहे. अवघ्या सात ते आठ वर्षांत एका स्त्रीने बलाढ्य कंपनीला कसा विरोध केला, शोषितांचे प्रश्न कशाप्रकारे आंदोलनाचे मुख्य विषय बनवले, वंचितांना कशाप्रकारे आधार दिला, याचा लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक.

आता डॉ. रुपेश पाटकर यांनी म्हणजे वैद्यही पाटकर यांच्या मुलानेच लिहिलेलं आहे, त्यामुळे केवळ ‘माझ्या आईची गोष्ट’ हे नाव आहे, असे मी मानतो. कारण खरंतर या पुस्तकाचं नाव ‘रणरागिणीची गोष्ट’ असं असायला हवं होतं. हे नाव अत्यंत समर्पक ठरलं असतं कदाचित. कारण खरंच वैद्यही पाटकर यांचं काम एखाद्या रणरागिणीपेक्षा कमी नाही. असो. तर हे पुस्तक डॉ. रुपेश पाटकरांनी आपल्या आईच्या संघर्षमय प्रसंगांसह काही कौटुंबिक किस्सेही यात आले आहेत. ज्यातून वैद्यही पाटकर यांना अधिक जवळून जाणून घेण्यास मदत होते आणि पर्यायाने त्यांच्याबद्दलचा आदर आणखी शंभरपटीने वाढतो.

चरित्र वगैरे टाईप हे पुस्तक. पण ‘चरित्र’ या शब्दात जो टिपिकलपणा आहे, तो या पुस्तकात यत्किंचितही जाणवत नाही. हे पुस्तक आधी म्हटल्याप्रमाणे प्रेरणादायी संघर्षाचा कोलाज आहे, आठवणींचा ठेवा आहे, घटनांच्या नोंदी आहेत आणि हक्क-अधिकार-न्यायासाठी लढणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देणारं अमृत आहे. हे पुस्तक खऱ्या अर्थाने इन्स्पिरेशनल टॉनिक आहे.

वैद्यही पाटकर या आंदोलनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या वगैरे नव्हत्या. त्या शोषित वर्गापैकीही नव्हत्या. मुळात त्यांचा पिंड हा काही कार्यकर्तीची नाही. तरीही त्या एका बलाढ्य कंपनीविरोधात ठामपणे उभ्या राहिल्या. यामागे महत्त्वाचं कारण होतं त्यांचं कुटुंब आणि मुलावरील प्रेम. कुटुंबाला भेडसावणाऱ्या एका समस्येपासून त्यांच्या संघर्षाचा प्रवास सुरु झाला आणि त्या प्रवासाने एवढं व्यापक रुप धारण केलं की, रिलायन्ससारख्या अत्यंत बलाढ्य कंपनीलाही त्यांनी नमतं घ्यायला लावलं.

मायनिंगचा प्रश्न असो वा कौटुंबिक अत्याचार, पोलिसांची गुंडगिरी असो वा एखाद्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची दमबाजी.... प्रत्येक ठिकाणी अन्यायाविरोधात वैद्यही पाटकर दिनदुबळ्या गरजवंतांच्या बाजूने बेधडकपणे लढल्या. राजकीकय दबाव असो वा प्रशासनाचा, कुठल्याही दबावाला बळी न पडता, निर्भीडपणे दबाव झुगारुन त्या लढत राहिल्या. या सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून डॉ. रुपेश पाटकरांनी मांडल्या आहेत.

पाटकर कुटुंब तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. वैद्यही पाटकरांच्या लढ्याचं क्षेत्रही हेच. पण त्यांच्या लढ्याचा इतिहास असा की, असंख्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरावा. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आंदोलनात उतरल्या आणि हजारो नागरिकांच्या आधारवड बनल्या. सर्वसामान्य गृहिणी ते एक बेडर कार्यकर्ती असा त्यांचा प्रवास. दरम्यानच्या काळात वाचनामुळे त्यांनी सिंधुदुर्गाची चौकट मोडत पार सातासमुद्रापलिकडल्या कार्ल मार्क्सचे विचारही वाचले आणि डाव्या विचारांप्रती आपली वैचारिक बैठकही मजबूत केली. आंदोलनातील सक्रीय सहभागाला वैचारिक बैठक मिळाली की, आंदोलन आणखी मजबूत स्थिती धारण करतो, हे वैद्यही पाटकरांनी आपल्या लढ्यातून सिद्ध करुन दाखवलं.

वैद्यही पाटकरांचा सक्रीय आंदोलनाती काळ अवघ्या 7 ते 8 वर्षांचा. मात्र तोही अत्यंत प्रभावी. वयाच्या 50 व्या वर्षी म्हणजे 2002 साली त्यांच्या सार्वजनिक आयुष्याला सुरुवात झाली, ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आयुष्याच्या शेवटच्या काळात कॅन्सरशी लढतानाही त्यांना आपल्या प्रकृतीपेक्षा आंदोलनाचीच काळजी अधिक होती. असा अत्यंत विस्मयचकित करणारा प्रवास.

स्वत:च्या बागेतून रिलायन्सची पाईपलाईन जाणार असल्याने बागेचे दोन तुकडे होणार होते. त्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे आधीच संशय. त्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांची याबाबत सविस्तर माहिती देण्यास सुरु असलेली चलढकल आणि त्यानंतर सरकारी अधिकारी रिलायन्ससारख्या बलाढ्य कंपनीच्या दावणीला बांधल्याने त्यांच्याकडूनही कारवाईची अपेक्षा नव्हती. यावेळी वैद्यही पाटकर यांच्या पतीने आणि मुलाने लढा उभा केला. सुरुवातीला वैद्यही पाटकरांचा या साऱ्या गोष्टीला विरोध होता. मात्र, कालांतराने अशा काही घटना घडत गेल्या की, या आंदोलनाच्या मुख्य चेहराच वैद्यही पाटकर बनल्या. पुढे मायनिंगविरोधातील लढा त्यांनी असा काही लढला की, एखाद्या मोठ्या संघटनेलाही लढता येऊ नये. जीवाला धोका असूनही बलाढ्य कंपनीविरोधात त्या उभ्या ठाकल्या. नागरिकांच्या न्याय्यहक्कांसाठी लढता लढता त्यांनी कौटुंबिक विषयही तितक्याच समजुतीने सोडवले. अगदी एखाद्या सामाजिक कार्यकर्तीसारखं त्यांनी आपलं कार्य केलं.

आंदोलन, उपोषण, मोर्चे, धरणं वगैरेंना ठाम विरोध करणाऱ्या वैदेही पाटकरांनी पुढे पुढे प्रत्येक आंदोलन स्वत:हून लावून धरलं. कलेक्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिस, एसपी, पोलिस वगैरे सर्वांना आपल्या बेडर आणि लढाऊ वृत्तीच्या जोरावर सामान्यांची बाजू ऐकण्यास लावले. अनेकवेळा हारही पत्कारावी लागली. मात्र त्यातून त्या खचून गेल्या नाहीत. प्रत्येक नव्या दिवशी नव्या उर्जेसह त्या लढत राहिल्या. त्यांच्या या विस्मयचकित करणाऱ्या उर्जेची त्यांच्या निकटवर्तीयांनाही आश्चर्य वाटे.

वैद्यही पाटकरांच्या संघर्षमय आयुष्यातून ज्याप्रकारे प्रेरणा घेण्यासारखं आहे, त्याचप्रकारे शिकण्यासारखंही खूप आहे. विस्मयचकित करणारंआयुष्य त्या जगल्या आहेत आणि डॉ. रुपेश पाटकर यांनी आपल्या आईचा हा प्रवास तितक्याच उत्तमपणे मांडला आहे.

डॉ. रुपेश पाटकरांचा पिंड कार्यकर्त्याचा, त्यामुळे त्यांनी वैद्यही पाटकरांच्या संघर्षावरच अधिक जोर देत लेखन केलं आहे. वैद्यही पाटकरांबद्दल पुस्तक वाचल्यावर वाचक म्हणून त्यांचं वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची इच्छा पुस्तकाच्या शेवटाकडे आल्यावर राहून राहून वाटत राहते. मात्र, लेखाने वैद्यही पाटकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तितकंसं डीपमध्ये लिहिलं नाही. जे लिहिलंय, त्या प्रसंगांनाही आंदोलनाशी संबंधित काही ना काही स्पर्श आहेच. त्यामुळे वाचक म्हणून वैद्यही पाटकर यांचं वैयक्तिक आयुष्यही आणखी वाचायला आवडलं असतं.

चळवळीतील कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढवणारं हे पुस्तक चळवळीबाहेरील तरुण-तरुणांही वाचायला हवं. याचं कारण, केवळ आपल्यापुरतं न जगता आपण या समाजाचंही देणं लागतो, याची जाणीव या पुस्तकातून नक्कीच निर्माण होईल आणि त्यादृष्टीने प्रेरणाही मिळेल. वैद्यही पाटकर नावाच्या लढाऊ कार्यकर्तीचं आयुष्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.