गोंदिया : आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया (Gondiya Assembly Constituency) जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. या गोंदिया जिल्ह्यात मोठे कारखाने नसले तरी, अनेक छोट्या लघु उद्योगातून नागरिक स्वयंरोजगार निर्माण करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात मनोहर भाई पटेल यांच्यासारखे शिक्षण महर्षी होऊन गेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हा जिल्हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं हे होमग्राऊंड आहे. 


अवघ्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आता राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी देखील सुरु करण्यात आलीये. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या लढतीनंतर आता राज्याची समीकरणं कशी बदलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गोंदिया जिल्हा विधानसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गोंदियात एकूण 04 विधानसभा मतदारसंघ असून सर्वठिकाणी हायव्होल्टेज लढाई पाहायला मिळू शकते.


गोंदिया जिल्ह्यातील आमदार


गोंदिया : विनोद अग्रवाल (अपक्ष)
मोरगांव अर्जुनी : मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी अजित पवार)
देवरी : आमगाव : सहषराम कोरोटे (काँग्रेस)
तिरोडा-गोरेगाव : विजय रहांगडाले (भाजप)


2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य


 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोंदिया विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 इतकी मतं मिळाली होती. तर भाजपाचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मतं मिळाली होते. काँग्रेसचे अमर वराडे यांनी 8 हजार 938 मतं मिळवली होती.


गोंदिया विधानसभेचे सध्या अपक्ष आमदार असून या ठिकाणी निवडणूक लढण्याकरिता इच्छुकांची मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळतंय.  राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन, केतन तुरकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून राजकुमार पटले, अमर वराडे, राजीव ठकरेले हे निवडणूक लढायला इच्छुक आहेत.भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले पंकज रहांगडाले, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे, गोपालदास अग्रवाल इच्छुक आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून माजी आमदार रमेश कुथे, पंकज यादव हे इच्छुक असल्याच्या चर्चा सुरु आहेत.  


 मोरगांव अर्जुनी :  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मनोहर चंद्रिकापुरे यांना 72 हजार 400 मते मिळाली होती. तर भाजपचे राजकुमार बडोले यांना 71 हजार 782 मते मिळाली होती. 


मोरगाव अर्जुनी विधानसभा गोंदिया जिल्ह्यात सर्वात हायव्होल्टेज अशी विधानसभा असणार आहे. या ठिकाणी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे भाजपकडून इच्छुक असून सध्या महायुतीमध्ये असलेले अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे देखील या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडणूक लढण्याकरिता इच्छुक आहेत. तर त्यांचे चिरंजीव डॉ. सुगत चंद्रिकापूर यांनी देखील जनसंपर्क दौरे सुरू केले असून ते देखील निवडून लढायला इच्छुक आहेत. 


विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे लढले नाही तर त्यांचे चिरंजीव डॉ. सुगत चांद्रिकापुरे या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत. तर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दानेश साखरे यांच्या देखील नावाची चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मिथुन मेश्राम हे इच्छुक असून त्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. काँग्रेस कडून देखील निवडून लढण्यासाठी इच्छुक असल्याची रांग लांबच असून त्यामध्ये हरीश बनसोड, डॉ. अजय लांजेवार, दिलीप बनसोड, अनिल दहिवले असे अनेक जण काँग्रेसकडून निवडणूक लढण्याकरिता इच्छुक आहेत.


 आमगाव- देवरी : आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत आमदार सहषराम कोरोटे यांना 88 हजार 265 इतकी मत मिळाली होती. तर भाजपचे संजय पुराम यांना 80 हजार 845 मत मिळाली होती. 


देवरी अमगाव या विधानसभेवर सध्या काँग्रेसचे सहषराम कोरोटे हे आमदार असून या ठिकाणी भाजपकडून माजी आमदार संजय पुराम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून गडचिरोली-चिमूर चे खासदार नामदेव किरसान यांचे चिरंजीव दुष्यंत किरसान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. 


 तिरोडा -गोरेगाव :  विधानसभेत 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत विजय रहांगडाले यांना 76 हजार 482 तर रविकांत बोपचे यांना 50 हजार 590 इतकी मते मिळाली होती.


तिरोडा-गोरेगाव या ठिकाणी सध्या भाजपचे विजय रहांगडाले  हे आमदार आहेत. मात्र, भाजपकडूनच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, धर्मेंद्र तुरकर, हेमंत पटले, गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे हे या ठिकाणी निवडणूक लढायला इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांची चिरंजीव रविकांत बोपचे हे निवडणूक लढायला इच्छुक आहेत. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र कटरे गोरेगाव तालुक्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले माजी आमदार दिलीप बनसोड आदींच्या नावाची काँग्रेसकडून जोरदार चर्चा आहे .


ही बातमी वाचा : 


विधानसभेची खडाजंगी: भंडाऱ्यात 3 मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती