भंडारा : आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. भंडारा (Bhandara Assembly Constituency) जिल्ह्याचा विचार केल्यास इथे साकोली, भंडारा आणि तुमसर असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा क्षेत्रात साकोली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शिलेदार शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर तुमसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे हे आमदार आहेत. आगामी निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघातील निवडणुका अत्यंत चुरशीची होणार असून सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली येथे बघायला मिळणार आहे. 


भात उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची संपूर्ण राज्यात ओळख आहे. येथील उत्पादित तांदळाची देशभरात विक्री होते. भातासोबतच भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ही ओळखला जातो.  या तलावांसोबतच गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प या जिल्ह्यात आहे. भंडारा - गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भंडाऱ्याची ओळख देश पातळीवरच्या राजकारणात आहे. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र तर गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र आहे. 


भंडारा जिल्ह्यातील तीन आमदार


1) भंडारा - नरेंद्र भोंडेकर (शिवसेना शिंदे)
2) साकोली - नाना पटोले (काँग्रेस)
3) तुमसर - राजू कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)


2019 मध्ये अशी झाली होती लढत


 2019 मध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र लढलेत तर शिवसेना, भाजप ही वेगवेगळी लढली होती. काँग्रेसकडून भंडाऱ्याची उमेदवारी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांना देण्यात आली होती. तर, भाजपकडून अरविंद भालाधरे आणि अपक्ष म्हणून नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणूक लढवली. यात नरेंद्र भोंडेकर यांनी विजयी मिळविला. सध्या ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. 


यावेळी दिसणार वेगळं चित्र?


सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असून त्यांच्या वतीने भंडाऱ्याची जागा शिवसेनेच्या गटात देऊन पुन्हा एकदा नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीचे उमेदवार बघितले जात आहे. यासोबतच काँग्रेसमध्येही अनेक इच्छुक आहेत. सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही अनेकांनी उमेदवारीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. 


भंडारा विधानसभा क्षेत्र 


भंडारा विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जातीकरिता आरक्षित आहे. इथं अपक्ष म्हणून निवडून आलेले नरेंद्र भोंडेकर यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीतेमुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा एकदा नरेंद्र भोंडेकर आगामी विधानसभा शिवसेनेकडून लढतील हे निश्चित मानलं जातं आहे. 2019 च्या लढतीमध्ये भोंडेकरांनी अपक्ष लढत 1,01,717 मते मिळवली होती. त्यांनी भाजपच्या अरविंद मनोहर भालाधारे यांचा पराभव केला होता.  


भोंडेकरांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, भंडारा ही विधानसभा शिवसेनेच्या गटात असल्याने या जागेवर काँग्रेस ऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कदाचित स्वकियांची डोकेदुखी आपल्या पाठीमागे वाढवून घेणार नाही. त्यामुळेच ही जागा ठाकरे गटाला सोडून इथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भोंडेकरांना पाडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आता मतदारांमध्ये रंगू लागली आहे. 


साकोली विधानसभा क्षेत्र


साकोली विधानसभा क्षेत्रातचे प्रतिनिधित्व आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत आहेत. मागील निवडणुकीत त्यांना भाजपकडून परिणय फुके यांनी अत्यंत निकराची झुंज दिली होती. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून परिणय फुके आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत नाना पटोलेंनी 95,208 मिळवत विजय मिळवला. भाजपच्या परिणय फुके यांचा त्यांनी 6,240 मतांनी पराभव केले होता. असं असलं तरी वंचितकडून काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी दिलेली लढतही लक्षवेधी ठरली होती. अटीतटीच्या लढतीत नाना पटोले यांनी भाजपचे परिणय फुके यांचा पराभव केला होता. 


तुमसर विधानसभा क्षेत्र


तुमसर विधानसभेचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. राजू कारेमोरे सध्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढणारे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा 7,700  पराभव केला होता. या निवडणुकीत राजू कारेमोरे यांना 87,190 मते मिळाली होती. 


सध्या महायुतीत राष्ट्रवादी असल्याने ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोट्यात येणार असून इथं राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनीही दावेदारी केली असून काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी मागील काही दिवसांपासून विधानसभा क्षेत्रात मतदारांपर्यंत पोहोचून काँग्रेसचा अजेंडा समजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या क्षेत्रात इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरीची ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.  


एकंदरीतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भंडारा जिल्ह्याचे असल्याने या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी नाना पटोलेंवर आहे. तर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने शिंदे इथे प्रचारात येतील. तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे असल्याने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर राहणार आहे. त्यामुळे साकोली, भंडारा आणि तुमसर या तिन्ही विधानसभा क्षेत्रात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.


ही बातमी वाचा : 


विधानसभेची खडाजंगी: गडचिरोलीत विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती