Maharashtra Politics : काँग्रेस (Congress) पक्षाला नवचैतन्य आणण्यासाठी एकीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशभरात भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींनी पायी दौरा करत ही यात्रा केली. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात वाद उफाळून आले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यस्थी घेत त्या वादाला मिटविलं होतं. मात्र आता काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचं प्रभुत्व असलेल्या गोंदिया (Gondia) जिल्ह्यातच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून गोंदिया जिल्हा काँग्रेस बचाव समिती स्थापन करून पक्षात बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, याकरता आजपासून अनिश्चित कालीन धरणं सुरू करण्यात आलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गोरेगाव येथे काँग्रेसच्या एका गटानं बंड पुकारला होता तर त्याला जिल्हाध्यक्षांनी दुजोरा दिल्याचा आरोप करत आता काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी धरणं आंदोलनाला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष, 02 तालुकाध्यक्ष, 10 विविध सेलचे अध्यक्ष, याशिवाय महिला अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रदेश कार्यकारिणीकडे बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली असून जर मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका आता पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील आपसी मतभेद चांगलेच उफाळून आले असल्याचं दिसून येत आहे.
गोंदियामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक करताना काँग्रेस पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी यांच्या निर्णयाचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ साधून जिल्हा उपाध्यक्ष गप्पु गुप्ता यांनी राजकुमार पटले यांना उपसभापती पदावर विराजमान केलं असल्याचा आरोप गोंदिया जिल्हा काँग्रेस बचाव समितीनं प्रदेश कमिटीला दिलेल्या एका निवेदनात केला आहे.
त्याचप्रमाणे अरुण गजभिये काँग्रेस पक्षातून कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जिंकले, पक्षांतर्गत ते उपसभापती निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. परंतु परस्पर त्यांचा विरोध करून अधिकारी कर्मचारी वर्गावर स्थानिक आमदारांच्या सहकार्यानं दबाव बनवून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी उपसभापती पदाच्या उमेदवारी फॉर्म्स मिळू देण्यात आले नाही, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना मोठा धक्का बसला आणि याप्रमाणे पक्षाची कोंडी करण्यात आली असल्याचा देखील आरोप या निवेदनात केला आहे. तसेच बंडखोरी करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी याकरिता गोंदिया जिल्हा काँग्रेस बचाव समितीच्या वतीनं अनिश्चित कालीन उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आल्याचं दिसत आहे.