गोंदिया : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बलात्कार,हत्या,आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता गोंदियाच्या (Gondia) कुडवा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या सख्ख्या भावाने आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून एकाची निर्घृण हत्या केली आहे. ही खळबळजनक घटना गोंदियाच्या (Gondia Crime) कुडवा येथे मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी आरोपी भावासह त्याच्या एक साथीदाराला पोलिसांनी अटक करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.


बहिणीशी प्रेम संबंध जिवावर बेतले  


 गोंदिया शहरापासून (Gondia Crime) जवळच असलेल्या कुडवा येथील गोंडीटोला रोड चौक परिसरामध्ये रविवार 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रज्वल मेश्राम असे मृतक तरुणाचे  नाव आहे. गोंदिया शहरापासून (Gondia) जवळच असलेल्या कुडवा येथील गोंडीटोला रोड चौक परिसरामध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय मृतक प्रज्वल मेश्रामचे त्यांच परसारात राहणाऱ्या  20 वर्षीय संकेत बोरकर याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होता. गेल्या अनेक दिवसांपसून मृतक प्रज्वल आणि आरोपी संकेत बोरकर याची बहिण एकमेकांशी बोलत होते. दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध अधिक वाढत गेले आणि यांच्यात काहीतरी सुरू असल्याचा संशय संकेत बोरकर याला आला. त्यामुळे तो या दोघांकडे अधिक लक्ष ठेवून होता. या प्रकाणाची चुणूक आरोपी संकेतला लागल्याने संकेतने प्रथम आपल्या बहिणीला समज देऊन प्रज्वलपासून दूर राहण्याचे सांगितले होते. तसेच प्रज्वलला देखील माझ्या बहिणीशी बोलू नकोस, तीच्यापासून लांब राहा असे अनेक वेळा बजावले होते. मात्र प्रज्वल याने याकडे दुर्लक्ष केले आणि या दोघांतील वाद अधिक विकोपाला गेला. 


...आणि रागाच्या भरात आरोपीने केले चाकूने सपासप वार  


आरोपी संकेत याने प्रज्वल याला माझ्या बहिणीशी प्रेमसंबंध ठेवू नकोस या बाबत अनेकवेळा धमकावले होते. मात्र  प्रज्वल याने संकेतच्या या धमक्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. आपण बाजावून देखील प्रज्वल आपले म्हणणे ऐकत नसल्याने अखेर संकेतने प्रज्वलचा काटा काढण्याचा कट रचला. हा वाद इतका विकोपाल गेला की या वादातून आरोपी संकेत याने रात्री 2 वाजताच्या सुमारास आपल्या मित्राच्या मदतीने प्रज्वलला रस्त्यात गाठले आणि त्यावर चाकूने सपासप वार करून ठार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलचा त्यांच क्षणी मृत्यू झाला. सदर थरारक घटनेची माहिती रामनगर पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला.त्यानंतर या प्रकरणी संकेत बोरकर आणि त्याच्या साथीदाराला  पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.तर संकेत बोरकर याचा एक साथीदार जखमी असल्याने त्याला नागपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.