Gondia Rains : गेल्या 24 तासांत गोंदिया (Gondia) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोंदिया शहराच्या जवळून वाहणाऱ्या पांगोली नदीच्या (Pangoli River) पाणीपत्रात देखील वाढ झाली आहे. या नदीवर बारब्रिक्स कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र हा पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरुन होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी दुसऱ्यांदा हा पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.


गोंदियातील पुजारीटोला धरणाचे 8 दरवाजे उघडले


गोंदिया जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झालेली आहे. पावसाचा जोर आताही कायम आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला धरण (Pujaritola Dam) हा रात्रीच्या पावसाने भरला असून या धरणाचे आठ दरवाजे एक फूट उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यातून 6021 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे.




भर उन्हाळ्यात पुजारीटोला धरण 92 टक्के भरलं होतं


दरम्यान तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात अनेक तलाव, धरण कोरडी पडली होती. परंतु त्याच वेळी गोंदिया जिल्ह्यातील  पुजारीटोला धरणात मात्र 92 टक्के जलसाठा उपलब्ध होता. गोंदिया जिल्ह्यातील शिरपुर धरणाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पुजारीटोला धरणात पाणीसाठा करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात पुजारीटोला धरण पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलेला होता. परिणामी या भागातील नागरिकांची दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट यंदा थांबली होती. 

गोंदियातील धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक जलसाठा


यंदाच्या परतीच्या पावसामुळे उन्हाळ्यात गोंदिया जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यावर अपेक्षित असा परिणाम जाणवला नाही. त्यात आता मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणांसह मध्यम व लघु प्रकल्पासह तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील जलाशयात मुबलक पाणी साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील 9 मध्यम प्रकल्पात 35.90 दलघमी पाणी साठा आहे. आता गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून धरणांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी वाढताना दिसत आहे. 

VIDEO : Gondia: दोन दिवसांपासून पवासाचा जोर वाढला; धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ



हेही वाचा