Gondia Rain Updates : गोंदिया (Gondia) जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसानं हैदोस घातला आहे. गेल्या 36 तासांपासून सुरु असेलल्या मुसळधार पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. गोंदिया शहरातील सखल भागांना तलावाचं स्वरूप निर्माण झालं आहे. शहरातील अनेक मुख्य चौकासह रस्त्यांवर 2 फुट पाणी साचल्यानं अनेक लोकांसह लहान मुलांना देखील आपले जीव मुठीत घेऊन रस्त्यावर येजा करावी लागत आहे. बांध, तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अशातच मुसळधार पावसामुळं एका शेतकऱ्याच्या घरातही पाणी शिरलं आणि पाहता पाहता पुराच्या पाण्यानं अख्खं घर वेढलं. 


गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बाम्हणी अंतर्गत झाशी नगर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यास कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी जीवनदान दिलं आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकरी रामलाल मोडकु सलामे हे काल (सोमवारी) कुटुंबातील सदस्यांसह शेतात असलेल्या घरी होते. झाशी नगर नजीक असलेल्या नाल्याला मुसळधार पावसामुळं अचानक पूर आला. पुरामुळेल रामलाल यांचं कुटुंब घरातून बाहेर निघू शकले नाहीत. पुराच्या पाण्यानं पाहता पाहता संपूर्ण घराला वेढा दिला. 


गावातील युवा शेतकरी महेंद्र चुटे हे दुध संकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ गावातील शेतकरी गटाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर सदर घटनेची माहिती दिली. तात्काळ गटातील शेतकरी, कृषि सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेतली. युवा शेतकरी गटाचे सदस्य यांना  कुटुंबातील 3 सदस्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, शेतकरी रामलाल मोडकु सलामे  यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू असताना अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं. 


तोपर्यंत कृषि सहाय्यक राजशेखर राणे आणि तलाठी राजू उपरीकर घटनास्थळी हजर झाले. त्यांनी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता शेतकरी रामलाल यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. दोघेही पुराच्या पाण्यात उतरले आणि रामलाल यांच्यापर्यंत पोहोचले. 30 मिनिटांनंतर शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांना पुरातून बाहेर काढण्यात यश आलं. कृषि सहाय्यक आणि तलाठी यांच्या कार्याचं कौतुक केलं गेलं. तसेच शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांनी प्रशासनाचे आभार मानले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :