गोंदिया : शालेय जीवनात शिक्षण घेणारे सर्व जुने विद्यार्थी, मित्र आणि त्यांना शिस्तीचे धडे देणारे तेच शिक्षक तब्बल 28 वर्षानंतर एकत्र आले. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील कुऱ्हाडी येथील रामकृष्ण विद्यालय इथे 1995 वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी (Students) आपल्या गुरुंचा (Teachers) सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी जणू काही शाळेचा वर्गच भरल्याचा भास सर्वांना झाला. आपण घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या नोकरीवर आहेत, हे बघून शिक्षकांनाही आनंद झाला. आपण आज ज्या पदावर आहोत ते केवळ शिक्षकामुळेच, ही जाणीव ठेवून आपल्या गुरुजनांचा सत्कार या विद्यार्थ्यांनी केला.
विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं जपणारा अनोखा सत्कार सोहळा गोंदिया जिल्ह्यातील कुऱ्हाडी येथील रामकृष्ण विद्यालयात पार पडला. सन 1995 मध्ये रामकृष्ण विद्यालयात इयत्ता दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा सोहळा आयोजित केला होता. अनेक वर्षे शिक्षक म्हणून सेवा केलेले माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि सन्माचिन्ह देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
28 वर्षांनंतरच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले
दहावीपर्यंत एकाच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यावेळी विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक आता सेवानिवृत्त झाले आहेत. आपली नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात रमलेल्या 1995 च्या दहावी बॅचचे ते विद्यार्थी तब्बल 28 वर्षांनंतर एकत्र आले होते. आपले विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, याचा आनंद आणि बऱ्याच वर्षाच्या भेटीगाठीने विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले. 28 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला सत्कार करुन आदर व्यक्त करणे, हा जीवनातील सर्वात मोठा आनंद असल्याची भावना यावेळी माजी शिक्षकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद मानकर हे होते तर प्रमुख अतिथी गेंदलाल उखरे सर, शोभा राणे मॅडम, डीगाराम डीब्बे सर, चिंतामन बघेले सर, केवलराम निर्विकार सर, नारायणदास निमावत सर, राऊत सर, बाबुलाल मेंढे सर, गणपत लांजेवार सर, प्रभाकर ढोमणे सर, इसुलाल सोनवाने सर, भैय्यालाल पाचे सर, सी. एच. बिसेन सर, सुधाकरजी फाये सर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद पटले, शैलेश नंदेश्वर, सत्यभामा पटले, माहेश्वरी पटले, दुर्गाप्रसाद चौधरी, अमीर सय्यद, पंकज खरवडे, ईश्वर उखरे रामू पारधी, चौकलाल वाढवे, गुणवंता पारधी, दिलेश्वरी पारधीसह 1995 चे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा