गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 30 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच दोषीला 10 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. गोंदियातील (Gondia) जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. महेश टेंभुर्णे (वय 32 वर्षे) असं दोषीचं नाव आहे.


चॉकलेटचं आमिष दाखवून मुलीवर अत्याचार 


दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत 27 ऑक्टोबर 2021 ही घटना घडली होती, आपल्या घराशेजारी राहणाऱ्या काकांच्या घरी झोपाळ्यावर एकटी झोका घेत असताना आरोपी महेश टेंभुर्णेने तिला पाहिलं. त्याने तिला चॉकलेटचं आमिष दाखवत घरामागे असलेल्या शौचालयाच्या खड्ड्याकडे नेले. चिमुकलीला चॉकलेटसाठी दहा रुपयांची नोट देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर चिमुकली ही घरी रडत रडत आली. तिच्या आईने तिला रडण्याचं कारण विचारता असता तिने घडलेली माहिती दिली.


दोषीला 30 वर्षांचा कारावास


यानंतरी मुलीच्या आईने आरोपी महेश टेंभुर्णेविरोधात केशोरी पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे यांनी केला होता. आरोपीचे वकील व अतिरिक्त सरकारी वकील कैलाश खंडेलवाल यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकार पक्षातर्फे सादर साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, इतर कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरुन आरोपी महेश टेंभुर्णे याला दोषी ठरवलं. त्यानंतर याला 30 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


दंडाची रक्कम मुलीला देण्याचा आदेश


आरोपीचे वकील आणि पीडित मुलीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए टी वानखेडे यांनी सादर केलेले साक्षीदार आणि वैद्यकीय अहवालासह इतर दस्तऐवज लक्षात घेऊन महेश टेंभुर्णे याला आयपीसीच्या कलम 376 (ए), बी अंतर्गत 20 वर्षांचा सश्रम कारावास तसंच पाच हजार रुपयांचा दंड, शिवाय दंड न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास. सोबतच 2012 च्या कलम 6 अंतर्गत  10 वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास चार महिन्यांची अतिरिक्त महिन्यांची शिक्षा, अशाप्रकारे एकूण 30 हजार वर्षांचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम संबंधित मुलीला देण्याचा आदेश दिला आहे.