Gondia News : गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या आमगाव शहरातील रिया फ्युएल स्टेशन या नावाने असलेल्या एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपावर (Petrol Pump) गुरुवारी (11 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास वाहनचालकांनी पेट्रोल (Petrol) भरुन वाहन चालवले मात्र काही अंतरावर गेल्यावर वाहने अचानक बंद पडत असल्याची तक्रारी पुढे आल्या. यात वाहन चालकांनी वाहने मेकॅनिककडे तपासल्यावर टँकमध्ये पेट्रोल नसून पाणी (Water) असल्याचं उघड झालं. यानंतर वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपासणी केली असता पेट्रोलऐवजी पाण्याचीच विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं.




तर अनेक वाहनधारकांनी पेट्रोल बाटलीत घेतले आणि पाहणी केली तर काय पेट्रोलच्या ऐवजी सरळ पाण्याची विक्री होत असल्याचे दिसून आलं. यावेळी पेट्रोल भरलेल्या वाहनचालकाच्या तक्रारी आणि गर्दी वाढत गेली. यावेळी तक्रार करुनही पाण्याची विक्री सुरुच होती. शेवटी आमगावचे तहसीलदार आणि एस्सार कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार करताच, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन पंप बंद केलं. मात्र पंप चालकाने संध्याकाळी चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत पेट्रोलऐवजी पाण्याची विक्री करुन वाहन धारकांची मात्र लूट केली. आता कंपनी आणि प्रशासन या पंपचालकांवर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


वाहनधारकांना भुर्दंड आणि नाहक त्रास
दरम्यान पेट्रोल पंपावर 115 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. परंतु वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी पाणी भरल्याने ती अचानक बंद पडत आहेत. टँकमध्ये पेट्रोल ऐवजी पाणी भरुन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. जर यामुळे वाहन बिघडलं तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्राहकांनी विचारला.


पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी पाठवले : हसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची माहिती
रिया फ्युएल स्टेशनवर पाणीमिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने आम्ही तहसीलदारांच्या आदेशानुसार पेट्रोल पंपावर आलो. या पेट्रोल पंपाची पाहणी करुन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसंच पेट्रोल पंपावरील सेल्स ऑफिसरना याबाबत कळवण्यात आलं असून यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.


अडीच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही 
क्रूडच्या किमतीत घसरण झाल्यानंतर आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती खाली येतील, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडूनही व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.