Gondia ST Freight Service : कोरोनाकाळात प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीच्या (ST) उत्पन्नावर परिणाम झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी एसटीने मालवाहतुकीची सेवा (ST Freight Service) विस्तारित केली. या मालवाहतुकीने एसटीला तारले. आता कोरोनानंतरही एसटीची मालवाहतूक जोरात सुरु आहे. आता तर घरातील सामान शिफ्ट करण्यासाठीही एसटी धावत आहे. या मालवाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडल्याचं चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात एसटीच्या मालवाहतुकीमधून चार महिन्यांत 1 लाख 66 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. 


कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे एसटी महामंडळाने मालवाहतुकीतून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षापासून एसटी महामंडळाने मालवाहतूकही सुरु केली. प्रवासी गाड्यांमध्ये काहीअंशी बदल करुन मालवाहतुकीसाठी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. 


या वस्तूंची एसटीद्वारे वाहतूक
किराणा, ऑटोमोबाईल, कटलरी, स्टेशनरी, शेतीमाल, सिमेंट, आणि अन्य मालाची वाहतूक एसटीद्वारे केली जाते. करार असल्याने महाबीजच्या बियाणे आणि कृषीमालाची वाहतूकही केली जाते. यंदा तर बालभारतीच्या शालेय पुस्तकांचा पुरवठा एसटीच्या मालवाहतुकीद्वारे करण्यात आला. 


दर परवडत असल्याने व्यापरी, ग्राहकांचा एसटीकडे कल
खासगी मालवाहतुकीच्या तुलनेत एसटी मालवाहतुकीचे दर परवडत असल्याने व्यापारी या सेवेला प्राधान्य देतात. बदल्या किंवा इतर कारणांमुळे एका गावातून दुसऱ्या गावात घर शिफ्ट करायचे म्हटल्यास एखाद्याला खासगी मालवाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. यात खर्चही जास्त असतो. त्यांना आता एसटीच्या मालवाहतुकीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. 


गोंदिया तिरोडा आगारातून 1 लाख 66 हजारांचं उत्पन्न 
राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आणि तिरोडा आगाराला मालवाहतुकीमधून 1 लाख 66 हजार 800 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये गोंदिया आगाराने 22 फेऱ्या केल्या असून, त्यात 1 लाख 62 हजार रुपये, तर तिरोडा आगाराने एकच फेरी केली असून, त्यात 4 हजार 800 रुपये उत्पन्न मिळालं आहे.